
शहरात महिन्याला शेकडो शुभमंगल होत असताना महापालिकेच्या विवाह नोंदणी विभागात महिन्याकाठी केवळ शंभर नवदाम्पत्य नोंदणी करीत आहेत.
नवदांपत्यांना विवाह नोंदणीसाठी रुग्णालयाकडे हेलपाटे मारावे लागतात
पिंपरी - विवाहाचा कायदेशीर पुरावा (Marriage Proof) म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate) अत्यंत महत्त्वाचे (Important) आहे. अनेक नवदाम्पत्यांमध्ये विवाह नोंदणीबाबत जागृती (Public Awareness) नाही. त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या कामावेळी अडचण निर्माण होते. शिवाय, विवाह नोंदणीसाठी महापालिकेने (Municipal) आठ क्षेत्रीय कार्यालयांत सोय केली आहे. मात्र, नोंदणी प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकारी क्षेत्रीय रुग्णालयांच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे (Medical Officer) असल्याने नवदांपत्याचा गोंधळ उडत असून, नोंदणीसाठी रुग्णालयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.
शहरात महिन्याला शेकडो शुभमंगल होत असताना महापालिकेच्या विवाह नोंदणी विभागात महिन्याकाठी केवळ शंभर नवदाम्पत्य नोंदणी करीत आहेत. शहरातील जोडप्यांना यापूर्वी विवाह नोंदणीसाठी दुय्यम निबंधक अथवा विवाह निबंधक कार्यालय पुणे अथवा पिंपरीत जावे लागायचे. एकाच ठिकाणी ही व्यवस्था असल्याने यंत्रणेवर ताण यायचा. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यासाठी महिनोमहिन्यांचा कालावधी लागायचा. त्यानंतर प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था महापालिका स्तरावर केली. पण आता प्रमाणपत्रावर क्षेत्रीय रुग्णालयांच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वाक्षरीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे गोंधळ उडत असल्याचे मोनिका साठे या नवविवाहितेने सांगितले.
विवाह नोंदणीसाठी आवश्यक...
वधू-वर आणि तीन साक्षीदारांना विवाह नोंदणी अधिकाऱ्यांसमोर अर्जावर स्वाक्षरी करावी लागते
विवाह लावणाऱ्या पुरोहित-भटजी यांची माहिती द्यावी लागते, त्यांची स्वाक्षरीही आवश्यक असते
मुस्लिमांना काझीची माहिती व त्यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. निकाहनाम्याची ॲटेस्टेड प्रत जोडावी लागते
वधू-वरांचा रहिवासी पुरावा, जन्मतारखेचे दाखले, लग्नविधीचे छायाचित्र, लग्नपत्रिका, पत्रिका नसल्यास प्रतिज्ञापत्र, तीन साक्षीदारांचे रहिवासी पुरावे
वर आणि वधू घटस्फोटित असल्यास कोर्टाच्या हुकूमनाम्याची सत्यप्रत आवश्यक
अनेकदा सॉफ्टवेअरमध्ये देखील बिघाड असल्याने नोंदणीस उशीर होतो. त्यामुळे अपॉइंटमेंट घेऊनही फायदा होत नसल्याने अनेकजण नोंदणीकडे पाठ फिरवत आहेत.
- मनोज शिरोळे, नागरिक
विवाह नोंदणीचे कामकाज प्रभागस्तरावर चालत होते. क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत पत्र दिले जायचे. आता प्रमाणपत्रावर स्वाक्षरीचे अधिकार ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहेत.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका