नव्या सिनेमांचा ओटीटीवर गजबजाट

ott.jpg
ott.jpg
Updated on

पुणे : गेली अडीच महिने चित्रपटगृहांच्या बॉक्स ऑफिसवर शुकशुकाट आहे. त्यामुळे तयार झालेल्या हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्स, अॅमेझॉनसारख्या ओटीटी प्लॅटफार्मचा पर्याय शोधला आहे. तिथे नव्या चित्रपटांचा 'गजबजाट' सुरू झाला आहे. चित्रपटांचा बिग बी अमिताभ बच्चनसारख्या महानायकाचे चित्रपटही या माध्यमातून प्रदर्शित होणार आहेत.

लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद, कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे प्रेक्षक घरात बसून आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून तयार असलेल्या चित्रपटांचे काय होणार, ही चिंता निर्मात्यांना आहे. या काळात थिएटरला पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मचा विचार करीत निर्माते त्याकडे वळू लागले आहेत. हिंदीबरोबर मराठी चित्रपटही आता या पर्यायाचा विचार करीत आहे. तज्ज्ञांच्या मते कमी बजेटचे चित्रपट केवळ ओटीटीवर रिलीज होतील, बिग बजेटच्या चित्रपटांना मात्र चित्रपटगृहे सुरू होण्याची वाट पाहावी लागेल.

सध्या अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा 'गुलाबो सिताबो' या चित्रपटाचे हक्क 'अॅमेझॉन प्राइम'ने विकत घेतल्याचे वृत्त आहे. तसेच अक्षयकुमारचा 'लक्ष्मी बाँब' हा 'डिस्ने हॉटस्टार'वर प्रदर्शित होणार आहे. शकुंतला देवी, गुंजन सक्सेना : कारगिल गर्ल, झुंड, लुडो यांसारखे मोठे कलाकार असलेले चित्रपट विविध 'ओटीटी प्लॅटफॉर्म'बरोबर वाटाघाटी करीत आहेत.

टी सीरिज ही कंपनी नेटफ्लिक्सबरोबर चर्चा करीत आहे. ओटीटीवर 25 ते 50 कोटी रुपये बजेट असलेले चित्रपट रिलीज होऊ शकतात. परंतु शंभर कोटी रुपयांपेक्षा मोठे बजेट असलेल्या चित्रपटांना मात्र अधिक प्रेक्षकवर्ग मिळविण्यासाठी चित्रपटगृहे सुरू होण्याची वाट पाहावी लागेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. हिंदी चित्रपटांसाठी लाभदायी असलेला हा पर्याय मराठीची प्रेक्षक संख्या कमी असल्याने फार फायदेशीर नाही, असे जाणकारांचे मत आहे. 

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणतात, "मराठी चित्रपटांना ओटीटी हा पर्याय ठरू शकत नाही. कारण मर्यादित प्रेक्षक संख्या आहे. परिणामी, मराठी चित्रपटांना या प्लॅटफॉर्मकडून पैसा देखील कमी मिळतो. पण मराठी चित्रपटांना त्याचा आधार नक्कीच ठरू शकतो." दिग्दर्शक किरण यज्ञोपवित म्हणतात, "ज्या सिनेमांचे बजेट कमी आहे, त्यांना हा पर्याय योग्य ठरू शकतो. पण मोठ्या बजेटचा सिनेमा असेल, तर त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही मोठा हवा असतो. थिएटरशिवाय हा प्रतिसाद मिळत नाही. परंतु  भविष्यात ओटीटीवर मराठी प्रेक्षकांची संख्या वाढली, तर मराठी चित्रपटांनाही हा पर्याय फायदेशीर ठरू शकेल."

मराठी चित्रपट ओटीटीवर- एबीसीडी हा मराठी चित्रपट 13 मार्च रोजी प्रदर्शित झाला आणि 14 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाला. निर्मात्यांनी हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर नेला. या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद लेले म्हणाले, "सिनेमा रिलीज झाल्यावर दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे ओटीटीव्यतिरिक्त अन्य पर्याय नव्हता. म्हणून अॅमेझॉन प्राइमचा पर्याय आम्ही निवडला. त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमागृहे सुरू झाले की तेथेही हा चित्रपट पुन्हा दाखविला जाईल.

इरफान खानचा इंग्लिश मीडियम आणि नवाझुद्दीन सिद्दिकीचा घुमके तू हे चित्रपट ओटीटीवर आले आहेत. त्याबरोबरीने आता.
अनुराग बासूचा ‘ल्युडो’, अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘चोक्ड’, शकुंतला देवी : ह्युमन कॉम्प्युटर’, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘शेरशाह’, ‘इंदु  की जवानी’, ‘खाली पिली’, ‘गुंजन सक्सेना : कारगिल गर्ल’, ‘रुही अफझाना’, ‘चेहरे’ हे चित्रपटही ओटीटीवर येत असल्याचे या क्षेत्रातील विश्लेषक सांगतात. लॉकडाऊनमुळे मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीला एक हजार कोटींचा फटका बसल्याचा अंदाजही जाणकार व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com