शिलालेखांबाबत नवे संशोधन - प्रसाद तारे

शिलालेखांबाबत नवे संशोधन - प्रसाद तारे

पुणे - शिवकालीन शिलालेख, किल्ल्यांवरील शिल्प यांच्याविषयी नवीन संशोधन समोर आले आहे. इतिहासाचे अभ्यासक प्रसाद तारे यांनी शिखर-शिंगणापूर, प्रतापगड, सुरत, कोल्हापुरातील पाटगाव येथील शिवकालीन गोष्टींचे संशोधन केले आहे. त्यानुसार शिखर शिंगणापूर येथील शिलालेखांविषयी नवी माहिती उजेडात आली आहे.

या संशोधनात्मक अभ्यासावर आधारीत निबंधाचे सादरीकरण भारत इतिहास संशोधक मंडळ येथे करण्यात आले आहे. तारे यांनी आपल्या संशोधनावरील माहिती पत्रकार परिषदेत दिली. तारे म्हणाले, ‘‘शिखर-शिंगणापूर येथील महादेव मंदिराच्या पायरीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मोठे बंधू राजश्री संभाजी महाराज यांची नावे कोरलेला शिवकालीन शिलालेख आहे. राजश्री संभाजी महाराज इ.स. १६५४-५५ च्या सुमारास लढताना धारातिर्थी पडले, त्यामुळे हा शिलालेख इ.स. १६३० ते १३५४ दरम्यानचा असावा.’’ राजश्री शहाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या आदेशावरून हा शिलालेख कोरला असावा, असा दावाही त्यांनी केला आहे.

पाटगाव (कोल्हापूर) येथे असलेल्या शिवकाळातील मौनी महाराज समाधी मंदिराच्या भिंतीवर ऐतिहासिक प्रसंग शिल्परूपात तयार करून बसवले आहेत. ही शिल्पे शिवाजी महाराजांची असावीत असा तर्क आहे. याचबरोबर दक्षिण गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील धरमपूर तालुक्‍यात पिंडवल नावाचा किल्ला आहे. किल्ले गिरिदुर्ग प्रकारातील असून याचे अवशेष शिल्लक  आहेत. या किल्ल्याबाबत स्पष्ट नोंद त्या वेळी सुरतेच्या वखारीमध्ये असलेल्या इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात असल्याची माहिती तारे यांनी दिली. ऐतिहासिक स्थळांवरील या शिवकालीन गोष्टींच्या अभ्यासाचे पुस्तकही प्रकाशित करणार असल्याचे तारे यांनी सांगितले. 

प्रतापगडावरील शिलालेख देवनागरी लिपीतील
प्रतापगडावरील श्री भवानीमातेच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दारातील एका दगडी पायरीवर शिलालेख कोरलेला आहे. यातील अक्षरे देवनागरी लिपीतील असल्याचे दिसून येतात. या देवीचे मंदिर १६६२ च्या आधी बांधले गेले आहे व शिलालेखसुद्धा त्याच सुमारास कोरले गेले असावेत, असे तारे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com