महापालिकेची नवी योजना; गावांच्या विकासासाठी "स्मार्ट व्हिलेज' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पाणी, रस्ते, आरोग्य या सुविधांच्या नावाने सलग अडीच वर्षे गावकऱ्यांनी गळा काढल्यानंतर आता नव्या गावांच्या विकासासाठी महापालिकेने नवा उपाय शोधला आहे. दरवर्षी एक गाव "स्मार्ट व्हिलेज' करीत गावकऱ्यांना शुद्ध पाणी, सक्षम आरोग्य यंत्रणा, दर्जेदार शिक्षण व्यवस्था, "स्मार्ट ट्रॅफिक' पुरविण्यात येणार आहे.

पुणे - पाणी, रस्ते, आरोग्य या सुविधांच्या नावाने सलग अडीच वर्षे गावकऱ्यांनी गळा काढल्यानंतर आता नव्या गावांच्या विकासासाठी महापालिकेने नवा उपाय शोधला आहे. दरवर्षी एक गाव "स्मार्ट व्हिलेज' करीत गावकऱ्यांना शुद्ध पाणी, सक्षम आरोग्य यंत्रणा, दर्जेदार शिक्षण व्यवस्था, "स्मार्ट ट्रॅफिक' पुरविण्यात येणार आहे. त्याचवेळी दहा गावांत अपेक्षित कामे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नव्या अकरा गावांच्या एकत्रित विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करणे अशक्‍य आहे. त्यामुळे चार टप्प्यांत "स्मार्ट व्हिलेज'ची योजना राबविली जाईल, असे महापालिकेडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र सर्वच गावांत नियोजनबद्ध विकासाची अपेक्षा असताना एकाच गावाला प्राधान्य का, अशी विचारणा होत आहे. त्यामुळे अंमलबजावणीआधीच ही योजना चर्चेत आली आहे. 

हद्दीलगतची अकरा गावे महापालिकेत येऊन अडीच-पावणेतीन वर्षे होत आली. तरीही, त्यांच्या विकासात भर घालण्यात महापालिकेला यश आले नसल्याची वस्तुस्थिती आहे. गावकऱ्यांच्या गरजांनुसार प्राधान्यक्रमही ठरविला; त्यानुसार सुविधा उभारण्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांनी केल्या. प्रत्यक्षात मात्र कोणत्याच योजना पुढे न सरकल्याने "महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतच बरी' अशी भूमिका घेऊन गावकऱ्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. तरीही, गावांत किमान पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या नाहीत. 

उत्पन्न घटीचे कारण देत महापालिकेच्या नव्या अर्थसंकल्पातही ठोस योजना आखलेली नाही. त्यामुळे नव्या गावांतील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर उपाय म्हणून आता स्थायीच्या अर्थसंकल्पात "स्मार्ट व्हिलेज' आणून त्यासाठी भरीव आर्थिक तरतुदीचा मार्ग महापालिकेने निवडला आहे. 

स्मार्ट व्हिलेज योजनेच्या पहिल्या टप्प्यांत दोन गावांची निवड होणार असून, त्यासाठी गावांतील लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. विशेषत: लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा विचार करून गावे निवडली जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ""एकाचवेळी सर्व भागांत सर्वच सुविधा पुरविण्यात अडचणी आहेत. त्यामुळे पैशांची उपलब्धता लक्षात घेऊन विकासकामे केली जातील. मात्र, तेव्हा सुविधांचा दर्जा चांगला असेल, त्यासाठी स्मार्ट व्हिलेजचा आराखडा तयार करण्यात येत आहे.'' 

विद्यार्थ्यांना एकाचवेळी दर्जेदार शिक्षण 
स्मार्ट व्हिलेज योजनेसाठी एक गाव निवडण्यात येणार असले, तरी स्मार्ट शाळांत अकरा गावांतील सर्व शाळांना सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व गावांतील विद्यार्थ्यांना एकाचवेळी दर्जेदार शिक्षण देणे शक्‍य होणार आहे. ई-लर्निंग, मॉडेल स्कूल आणि आनंददायी शिक्षणव्यवस्था उभारून शैक्षणिक गुणवत्ता वाढविली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New scheme of municipal corporation Smart Village for Village Development