अरुणाचलातील अभयारण्यात नव्या सापाचा शोध

नितीन चौधरी  
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

अरुणाचल प्रदेशमधील ताले अभयारण्यातील एका सापाच्या प्रजातीला शोधण्यात यश आले असून, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) संचालकांच्या नावाने ती ओळखली जाईल. चीन आणि म्यानमारच्या सीमेवरील हिमालय पर्वतरांगांमध्ये ही जात आढळते.

पुणे - अरुणाचल प्रदेशमधील ताले अभयारण्यातील एका सापाच्या प्रजातीला शोधण्यात यश आले असून, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) संचालकांच्या नावाने ती ओळखली जाईल. चीन आणि म्यानमारच्या सीमेवरील हिमालय पर्वतरांगांमध्ये ही जात आढळते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

ट्रॅकिशिअम आपटेई असे या सापाचे नाव ठेवले असून, तो जमिनीत गाडून (फॉसिरियल) घेत असल्याने त्याच्या अस्तित्वाविषयी फारशी माहिती उघड झालेली नव्हती. अरुणाचल प्रदेशातील घनदाट जंगलात ती आढळते. बीएनएचएसमधील संशोधन हर्षल भोसले, बंगळूरच्या नॅशनल सेंटर फॉर बॉयोलॉजिकल सायन्सेसमधील झिशान मिर्झा व फर्ग्युसन महाविद्यालयातील गौरांग गोवांडे यांच्या टीमने याचा शोध लावला. गेले वर्षभर सुरू असलेल्या या सापावरील संशोधनाची ‘सायन्स डायरेक्‍ट’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मासिकाने दखल घेतली आहे.

या संशोधनासाठी या तिघांनी अरुणाचलमधील या अभयारण्यात अडीच महिन्यांचा काळ घालविला. ट्रॅकिशिअम या प्रजातीतील सापांचे सात प्रकार आढळतात. नव्याने शोधलेल्या आपटेई या पोटजातीतील सापाच्या पोटांवरील खवले हे इतर सापांच्या तुलनेत जास्त आहेत. २०११ मध्येही या प्रजातीतील साप सापडला होता. वेगवेगळ्या मोहिमांमध्ये केलेल्या संशोधनातून हा साप वेगळा असल्याचे लक्षात आले. यासाठी लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये डीएनए चाचणी करून त्यावर अधिक संशोधन केले. याच वैशिष्ट्यांआधारे या सापाला नाव देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता घेतली. ईशान्येकडील जंगलांत जैवविविधता आहे. मात्र, येथील विकासकामांमुळे ही विविधता धोक्‍यात आली. या भागातील अनेक प्रजातींचा शोध घेण्यापूर्वीच त्या नष्ट होतील, अशी भीती भोसले यांनी व्यक्त केली.

आपटे यांचा गौरव
हा नवीन साप ‘बीएनएचएस’चे संचालक डॉ. दीपक आपटे यांच्या नावे ओळखला जाईल. आपटे यांनी गेली ३० वर्षे सागरी जीवशास्त्रात मोलाचे संशोधन करण्यात घालविली आहेत. चार वर्षांपासून ते संस्थेचे संचालक आहेत. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून ट्रॅकिशिअम आपटेई हे नाव दिल्याचे हर्शल भोसले  यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new snake in Arunachal Pradesh