पश्‍चिम भागातील पाणीपुरवठ्यात होणार सुधारणा

पश्‍चिम भागातील पाणीपुरवठ्यात होणार सुधारणा
Published on: 

पश्‍चिम भागासाठी नवीन टाकी

कास तलावातून येणाऱ्या पाण्‍याची वाहिनी जोडण्‍यात येणार

सातारा, ता. १५ : शहराच्‍या पश्‍चिमेकडील महादरे, मोरे कॉलनी, केसरकर कॉलनीसह हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्‍या भागासह व्‍यंकटपुरा पेठेच्‍या काही भागाला पुरेसा पाणीपुरवठा तांत्रिक कारणांमुळे होत नाही. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांचा त्रास कमी करण्‍यासह पाणीपुरवठा सुरळीत करण्‍यासाठी या भागासाठी नव्‍याने पाच लाख लिटर क्षमतेची साठवण टाकी उभारण्‍यात येणार असून, त्‍यात कास तलावातून येणाऱ्या पाण्‍याची वाहिनी जोडण्‍यात येणार आहे.
हद्दवाढीनंतर महादरेसह लगतचा भाग पालिकेत आला. या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. वाढत्‍या नागरीकरणामुळे पाण्‍याची मागणीत देखील वाढ हाेत असून, मागणीनुसार पाणीपुरवठा करताना यंत्रणेवर ताण येत आहे. या ताणाचा परिणाम या भागातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्‍या या भागांना समाधीचा माळ परिसरातील योजनेतून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. जीवन प्राधिकरणाकडून या योजनेस मिळणारे पाणी मर्यादित असल्‍याने काही भागांना तीन दिवसांतून एकदा पाणी मिळते. याबाबतच्‍या तक्रारी नगरसेविका मुक्‍ता लेवे यांच्‍याकडे नागरिक नोंदवत. या तक्रारी व नागरिकांच्या मागणीची दखल घेत मुक्‍ता लेवे यांनी याचा पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. पाठपुराव्‍यानुसार पालिकेने याठिकाणच्‍या पाणीपुरवठ्यासाठी नव्‍याने पाच लाख लिटरची साठवण व वितरण व्‍यवस्‍था उभारण्‍याचा निर्णय घेतला आहे. नव्‍याने बांधण्‍यात येणाऱ्या टाकीला कास योजनेतून येणारे पाणी देण्‍यात येणार आहे. यामुळे येथील नागरिकांना आगामी काळात मुबलक पाणी मिळणे शक्‍य होणार आहे.
.........
निधीसाठी अंदाजपत्रक
या कामासाठीचे अंदाजपत्रक तसेच इतर तांत्रिक प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरू केली असून, यासाठी लागणारा निधी १५ वा वित्त आयोग किंवा इतर शासकीय योजनेतून मिळवला जाणार आहे.
..........
तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्‍प
सद्य:स्‍थितीत पॉवर हाऊस जलशुद्धीकरण केंद्र तसेच मुख्‍य वाहिनीवरून व्‍यंकटपुऱ्यासह काही भागास पाणीपुरवठा करण्‍यात येतो. यात तांत्रिक बिघाड झाल्‍यास येथील भागाचा पाणीपुरवठा ठप्‍प होतो. या नवीन टाकीमुळे साठवण आणि वितरण दोन्‍ही कामे करणे शक्‍य होणार आहे.
............
कोट
महादरेसह विस्‍तारीत भागातील नागरिकांची पाण्‍यासाठी मोठी परवड होत आहे. ही परवड टाळण्‍यासाठी तसेच समाधीचा माळ पाणी योजनेवरील अवलंबित्व कमी करण्‍यासाठी साठवण आणि वितरण टाकी महादरे परिसरात उभारण्‍यात येत आहे.
मुक्‍ता लेवे, नगरसेविका, सातारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.