पुण्यात निओ मेट्रोही धावणार; ४,९४० कोटींचा होणार खर्च

पुण्यातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गावर (एचसीएमटीआर) निओ मेट्रो करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महामेट्रोने त्याचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) सादर केला आहे.
NIO Metro
NIO MetroSakal
Summary

पुण्यातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गावर (एचसीएमटीआर) निओ मेट्रो करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महामेट्रोने त्याचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) सादर केला आहे.

पुणे - पुण्यातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गावर (एचसीएमटीआर) निओ मेट्रो करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महामेट्रोने त्याचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) सादर केला आहे. त्यामध्ये शहरात ४३.८४ किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार मार्गावर इलोव्हेटेड निओ मेट्रो धावू शकणार आहे. यामध्ये ४५ स्थानकांचा समावेश आहे. हा प्रकल्प २०२३ डिसेंबरमध्ये सुरू झाल्यास २०२८-२९मध्ये पूर्णत्वास जाऊ शकतो. यासाठी ४ हजार ९४० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. महामेट्रोतर्फे ‘एचसीएमटीआर’ मार्गाचा हा डीपीआर महापालिकेला सादर केला आहे.

पुणे महापालिकेच्या १९८७ च्या विकास आराखड्यात ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प निश्‍चित केला. या मार्गामुळे वाहतूक सुरळीत होईल, असा दावा केला जात होता. २०१७ मध्ये ‘एचसीएमटीआर’ मार्गावर चार लेन खासगी वाहनांसाठी तसेच बीआरटी प्रस्तावित केली. पण याच्या निविदा मागविल्या असता खर्च साडेसात हजार कोटी रुपये अपेक्षित असताना १२ हजार कोटींच्या पुढे निविदा आल्याने हा प्रकल्प रद्द केला. त्यानंतर कमी खर्चात चांगली सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘एचसीएमटीआर’च्या मार्गावर ‘मेट्रो निओ’ करावी असा पर्याय समोर आला. त्याबाबत डीपीआर तयार करण्याचे काम महामेट्रोला देण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात महामेट्रोने फेज दोन मधील मेट्रो मार्गांचा डीपीआर महापालिकेला सादर केला. तर नुकताच निओ मेट्रोचा डीपीआर सादर केला.

दाट लोकवस्तीमधून निओ मेट्रो नेऊन त्याचा जास्तीचा जास्त सर्वसामान्य नागरिकांना वापर करता यावा, त्यांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच खरा एचसीएमटीआर मार्ग ३६ किलोमीटरचा आहे, पण हा डीपीआर तयार करताना खडकी कॅन्टोन्मेंटचा भाग जोडल्याने हा नवा मार्ग ४३.८४ किलोमीटर पर्यंत गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा असणार मार्ग

निओ मेट्रोचा ४३.८४ किलोमीटरचा मार्ग बोपोडी येथून सुरू होणार आहे. आंबेडकर चौक स्टेशन हे पहिले स्थानक असणार आहे, त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रस्ता, केळेवाडी, पौडफाटा, अलंकार पोलिस ठाणे, सिद्धी गार्डन, सेनादत्त पोलिस चौकी, सणस क्रीडांगण, लक्ष्मी नारायण चौक, सिटी प्राइड स्टेशन, मार्केट यार्ड, गंगाधाम चौक, बिबवेवाडी, लुल्लानगर, जांभूळकर चौक, फातिमानगर, घोरपडी, पिंगळे वस्ती, वडगाव शेरी, विमाननगर, विमानतळ, विश्रांतवाडी, डेक्कन महाविद्यालय, खडकी मेथडीस्ट चर्च आणि बोपोडी असा हा मार्ग असणार आहे. यामध्ये ४५ स्थानकांचा समावेश केला आहे.

प्रतिकिलोमीटर ११२ कोटी खर्च

मेट्रो प्रकल्पासाठी एका किलोमीटरसाठी किमान २५० कोटी रुपये खर्च येतो. पण निओ मेट्रोचा खर्च तुलनेने खूप कमी आहे. त्यामुळे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडतो. तसेच निओ मेट्रोसाठी जागा कमी लागते. डबे मेट्रोप्रमाणे असले तरी ती रबरी टायरवर धावते त्यामुळे खर्च कमी होतो. पुणे शहरात ४३.८४ किलोमीटरची मेट्रो होणार असल्याने यासाठी प्रतिकिलोमीटर ११२ कोटी रुपये खर्च येणार आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी ३ हजार ८६७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पण प्रकल्प सुरू असताना प्रतिवर्षी पाच टक्के महागाई वाढणार असल्याचे गृहित धरून व त्यावरील व्याजाचा विचार करून या प्रकल्पाचा एकूण खर्च ४९४० कोटी इतका होणार असल्याचे डीपीआरमध्ये नमूद केले आहे.

निओ मेट्रो म्हणजे...

सार्वजनिक बसच्या तुलनेत तीन ते पाचपट अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ‘निओ मेट्रो’मध्ये आहे. याचे कोच विजेवर धावतात; तसेच ताशी ९० किलोमीटर वेगाने ‘निओ मेट्रो’ धावू शकते.

संभाव्य प्रवासी संख्या

  • २०२८ : २.७५ लाख

  • २०३८ : ४.७१ लाख

  • २०४८ : ६.५० लाख

  • २०५८ : ७.८३ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com