शिवसेनेशी युती नकोच! - भाजप आमदार

मंगेश कोळपकर ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही, याबद्दल सध्या अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. शहरात भाजपची ताकद वाढलेली असल्यामुळे युती करण्याची गरज नाही, असा आग्रही सूर भाजपमधील काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी लावला आहे तर, समाधानकारक जागांसाठी शिवसेनेचा आग्रह आहे.
आमदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली असून भाजपच्या इतर दोन आमदारांनीही युतीची गरज नसल्याचे मत नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे.

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही, याबद्दल सध्या अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. शहरात भाजपची ताकद वाढलेली असल्यामुळे युती करण्याची गरज नाही, असा आग्रही सूर भाजपमधील काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी लावला आहे तर, समाधानकारक जागांसाठी शिवसेनेचा आग्रह आहे.
आमदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली असून भाजपच्या इतर दोन आमदारांनीही युतीची गरज नसल्याचे मत नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी युती करायची किंवा नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, स्थानिक पातळीवरील निर्णय घेण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिफारस करावी त्यानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल, असे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. त्यानुसार भाजप-शिवसेनेमध्ये चर्चेची फेरी येत्या चार-आठ दिवसांत सुरू होईल, असे दोन्ही पक्षांतील सूत्रांनी सांगितले. शिवसेना किमान 62 जागांवर दावा करणार असल्याचेही पक्षाकडून सांगितले जात आहे. भाजपने उर्वरित 100 जागांत आयात उमेदवार, रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुकांना संधी द्यावी, अशा आशयाचा शिवसेनेचा फॉर्म्युला आहे. याशिवाय प्रभागनिहाय परिस्थितीवरही उमेदवार निश्‍चित करू, असेही त्यांचे म्हणणे आहे.

भाजपचा हुरूप वाढला
प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्यामुळे पक्षीय पातळीवर मतदान होईल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे भाजपकडे यंदा इच्छुकांची संख्या वाढली आहे. नगर परिषदांच्या निवडणुकांतही भाजपला मिळालेल्या मतांमुळे शहरातील भाजपचा हुरूप वाढला आहे. आठही विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदारांनी त्यांच्या-त्यांच्या भागातील प्रभागांवर लक्ष केंद्रित केले असून त्यानुसार इच्छुकांमधून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी ते याद्या तयार करीत आहेत.

शिवसेनेकडूनही व्यूहरचना
शिवसेनेने शहरस्तरावर प्रभागनिहाय बैठका घेतल्या आहेत. पक्षाचे चिन्ह प्रत्येक प्रभागात पोचले पाहिजे, या भूमिकेबरोबरच सेनेचे उमेदवार विजयी होण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करण्याची व्यूहरचना सेनेने केली आहे.

इच्छुकांना समजाविण्याचे आव्हान
कोथरूड, कसबा आणि पर्वतीमध्ये भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असून पाच मतदारसंघांतून विरोधी पक्षांतून काही उमेदवार भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे युती करायची असेल तर, दोन्ही पक्षांना इच्छुकांची समजूत घालावी लागणार आहे.
 

कोथरूड ठरणार कळीचा मुद्दा
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीवेळी युतीच्या जागा वाटपात कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जागांवर कमालीचा वाद झाला होता. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला प्रचंड मताधिक्‍य मिळाले आहे. त्यामुळे मताधिक्‍य मिळालेल्या प्रभागांतील जागा शिवसेनेला का सोडायच्या, असा प्रश्‍न भाजपचे काही निष्ठावान करीत आहेत.
 

...म्हणून भाजपला युती नको
युती झाली तर, शिवसेनेला किमान 30 टक्के जागा द्याव्या लागतील. अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुकांना किमान 20 टक्के जागा द्यावा लागतील. तसेच रिपब्लिकन पक्ष व घटक पक्षालाही पाच टक्के जागा द्याव्या लागतील. त्यामुळे भाजपच्या निष्ठावान उमेदवारांसाठी एकूण जागांपैकी 45 टक्केच जागा शिल्लक राहतात. सर्वच प्रभागांतील इच्छुकांची संख्या लक्षात घेतली तर, 45 टक्के जागांवर कार्यकर्त्यांचे समाधान कसे करायचे, हा प्रश्‍न आहेच. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर भाजपने स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी आणि निवडणुकीनंतर शिवसेनेबरोबर युती करावी, असे एक खासदार, काही आमदार आणि शहर स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्यांनी म्हणणे मांडले आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीपेक्षा भाजपची ताकद शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मतदानावरूनही ते दिसून आले आहे. महापालिकेत भाजपचा महापौर होणार असल्याचे निवडणुकीच्या काही सर्वेक्षणातूनही दिसून आले आहे. त्यामुळे पक्षाने शिवसेनेशी युती करण्याची काहीही गरज नाही, अशी भूमिका आम्ही पक्षाकडे मांडली आहे. या भूमिकेला अनेक आमदार, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनाही पाठिंबा दिला आहे.
युतीची भाजपला गरज नाही.
- मेधा कुलकर्णी, आमदार

Web Title: no alliance with shiv sena, says bjp