esakal | पुण्यात आज कोरोना लसीकरण नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccinations

पुण्यात आज लसीकरण नाही!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नागरिकांना कोरोनापासून स्वतःचा बचाव करायचा आहे, लस घेण्यासाठी त्यांचधडपड सुरू आहे; पण शासनाकडून लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेचा खेळखंडोबा झाला आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी दोनचकेंद्र सुरू आहेत. तर ४५ पासून पुढील वयोगटातील नागरिक देखील लसीकरणासाठी केंद्रांवर खेटे मारत आहेत. त्यातही दुसरा डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक हवालदिल होत आहेत. सोमवारी (ता. ३) शहरात लसीकरण होणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शहरातील आरोग्य व्यवस्था देखील अपुरी पडत असल्याने नागरिकांना बेड शोधत फिरावे लागत आहे. अशा स्थितीत लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला, सहव्याधी नागरिकांचा प्रयत्न आहे. महापालिकेचे शहरात ११० लसीकरण केंद्रे आहेत. तर ७२ खासगी केंद्रे आहेत. पण लसच नसल्याने पालिकेचे लसीकरणही थंडावले आहे.

रोज केवळ ३५० डोस
१८ ते ४४ वयोगटासाठी शहरात कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू आहे. या दोन्ही केंद्रांवर सात दिवसांसाठी ५ हजार कोव्हीशिल्ड लशीचे डोस आले आहेत. त्यामुळे रोज ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशांनाच लस दिली जात आहे. शनिवारी (ता. १) १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला, पण त्यावेळी शेकडो नागरिक नोंदणी न करताच तेथे आले होते. त्यामुळे त्यांना परत पाठविण्यात आले. रविवारी हे लसीकरण बऱ्यापैकी सुरळीत झाले. ठरलेल्या वेळेमध्ये गर्दी न करता नागरिक लसीकरण करत होते. मात्र, लसीकरणासाठी केवळ ३५०च डोस रोज उपलब्ध असल्याने अवघ्या काही मिनिटात बुकिंग होत असल्याने तरुणांना अपॉईटमेंट मिळत नसल्याचे समोर आले आहेत.


दुसरा डोस कधी मिळणार?
पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी नागिरकांना दुसरा डोस घ्यायचा आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्या नागरिकांची संख्या जास्त. काही जण ऑनलाइन बुकिंग करून लसीकरण केंद्रांवर जात आहेत. तर काही जण थेट जात आहेत. केंद्र शासनाकडून ४५ च्या पुढील वयोगटासाठी लस उपलब्ध झाल्यावर त्यामध्ये दुसऱ्या डोसाला प्राधान्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पण लस उपलब्धच होत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. ले

सलग तिसऱ्या दिवशी केंद्र बंद
कोरोनाला थांबविण्यासाठी लॉकडाउन केले आहे. याच काळात लसीकरण वाढविण्यावर भर दिला जाणार, असे शासनाकडून सांगण्यात आले. मात्र, लस उपलब्ध नसल्याने शनिवार आणि रविवारी केंद्र १०० टक्के बंद ठेवण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. त्यातच आता सोमवारीही लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याने लसीकरणाचे तीन दिवस वाया गेले आहेत. मंगळवारी लस उपलब्ध होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

''१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी पाच हजार डोस मिळाले असून, ते सात दिवस वापरले जाणार आहेत. केवळ ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांनाच ही लस मिळेल. तसेच ४५ ते पुढील वयोगटासाठी शासनाकडून लस मिळाली नसल्याने सोमवारी (ता. ३) लसीकरण बंद असेल. लस उपलब्ध झाल्यास मंगळवारी ४५ ते पुढील वयोगटासाठी लसीकरण सुरू होईल.''
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

पुणे मनपा हद्दीत सोमवारी कोरोना लसीकरण नाही !

''पुणे मनपा हद्दीत ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण उद्या बंद राहणार असून लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील माहिती दिली जाईल. तर १८ ते ४४ वयोगटासाठी कमला नेहरू हॉस्पिटल आणि राजीव गांधी हॉस्पिटल येरवडा येथे नोंदणी केलेल्या नागरिकांना लस मिळेल.''

- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे महापालिका

loading image