ड्रेनेज लाइन नसल्याने रस्त्याला धोका; पाण्याच्या प्रवाहामुळे किरकटवाडी-नांदोशी रस्त्याला जागोजागी भगदाड

वेळीच उपाययोजना न झाल्यास अपघाताची शक्यता
no drainage line Kirkatwadi-Nandoshi road issue PMRDA
no drainage line Kirkatwadi-Nandoshi road issue PMRDAsakal

किरकटवाडी : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर काम पूर्ण झालेल्या किरकटवाडी-नांदोशी रस्त्याच्या कडेने पावसाचे पाणी जाण्यासाठी ड्रेनेज लाईनची व्यवस्था न करण्यात आल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे रस्त्याच्या कामासाठी टाकण्यात आलेली भर वाहून जात असून जागोजागी भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी रस्ता लवकर खराब होऊन मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पावसाचे पाणी रस्त्याच्या आजूबाजूच्या घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे साडेतीन कोटी रुपये निधी खर्च करुन किरकटवाडी-नांदोशी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम दिड वर्षापूर्वी करण्यात आले. खराब रस्त्यामुळे किरकटवाडी,नांदोशी, सणसनगर,वांजळवाडी या परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्षे सुरू असलेली रस्त्याची परवड त्यामुळे दूर झाली. एका बाजूला नागरिकांची सोय झाली असली तरी पावसाचे पाणी जाण्यासाठी अपेक्षित नियोजन व व्यवस्था न करण्यात आल्याने दुसऱ्या बाजूला रस्त्यावर येत असलेल्या पाण्यामुळे गैरसोय होताना दिसत आहे. तसेच उतारावरुन पाणी वाहत येत असल्याने प्रवाहाच्या वेगामुळे रस्त्यासाठी टाकण्यात आलेली भर वाहून जात आहे. परिणामी जागोजागी रस्त्याला भगदाड पडत असल्याने रस्ता खचून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

" रस्ता करत असताना आरसीसी पावसाळी ड्रेनेज लाईन करणे अपेक्षित होते. पीएमआरडीए ने याबाबत कोणतेही नियोजन केलेले नाही. परिणामी सध्या रस्त्याला धोका निर्माण झाला आहे."

-नरेंद्र हगवणे, आर्किटेक्ट, किरकटवाडी.

"नागरिकांचा कामाला विरोध आहे असे सांगून प्रशासन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी विरोध नाही तेथे का काम करण्यात आले नाही. रस्त्याला तळ्याचे स्वरुप येत असून ये-जा करताना त्रास होत आहे."

- संदीप हगवणे, नागरिक,किरकटवाडी.

"नागरिकांचा विरोध असल्याने ड्रेनेज लाईनचे काम करता आले नाही. तसेच रस्त्याच्या कडेने किरकटवाडी व नांदोशीची पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी असल्याने खोदकामास अडथळा येत आहे. जर जलवाहिनी स्थलांतरित करण्यात आली तर ड्रेनेज लाईनचे काम करता येऊ शकते. रस्त्याची तातडीने पाहणी करण्यात येणार असून लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल."

- ज्ञानेश्वर आतकरे, कनिष्ठ अभियंता, पीएमआरडीए.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com