'कॅशिअरसोबत फ्लर्टिंग नको, फुकटचा सल्लाही नको'; पुण्यातल्या हॉटेलमधील मेनूकार्ड चर्चेत

टीम ई-सकाळ
Tuesday, 23 February 2021

'पुणं तिथं काय उणं' या उक्तीसह 'पुणेरी पाटी'चा एक वेगळाच रुबाब आहे. असंच एक पुणेरी पाटी कम 'मेनूकार्ड' सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

'पुणं तिथं काय उणं' या उक्तीसह 'पुणेरी पाटी'चा एक वेगळाच रुबाब आहे. असंच एक पुणेरी पाटी कम 'मेनूकार्ड' सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. एका युजरनं हे मेनूकार्ड शेअर केलं असून त्यावर आश्चर्य व्यक्त करणारं कॅप्शनंही दिलं आहे.

पुण्यातील बाणेर येथिल इराणी कॅफेमधील हे मेनुकार्ड असून ते पाहिल्यानंतर ग्राहकांना देण्यात आलेल्या अनावश्यक सूचनांमुळे तुमच्या भुवया उंचावतील. या कॅफेने विविध प्रकार करणाऱ्या ग्राहकांना आपल्या कॅफेमध्ये मज्जाव केला आहे. यांपैकी काही मजेशीर प्रकारांचा तर काही विचित्र प्रकारांचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. 

मेनूकार्डमध्ये ग्राहकांनी कॅफेत आल्यानंतर कुठल्या गोष्टी टाळाव्यात यासाठी एक यादीचं दिली आहे. लॅपटॉप आणू नये, स्मोकिंग करु नये, उधारी करु नये, बाहेरचे खाद्यपदार्थ आणू नयेत, मोठ्यानं बोलू नये, पैसे देताना घासाघीस करु नये, सुट्ट्या पैशांची विचारणा करु नये, माचिस मागू नये, वायफळ गप्पा मारु नये, गर्दी करु नये, चूळ भरू नये, खुर्च्यांवर पाय ठेवून बसू नये, झोपू नये, इकडून तिकडे धावू नये, टेबलखाली च्युंगम लावू नये, मोबाईलवर गेम खेळू नये, फूड कुपन देऊ नये, कॅशिअरसोबत फ्लर्टिंग करु नये तसेच फुकटचे सल्ले देऊ नयेत, अशा भरमसाठ सूचना देण्यात आल्या आहेत. त्याही मेनू कार्डमध्येच! 

या हॉटेलनं आपल्या ग्राहकांना दिलेले हे सल्ले ऐकून तुम्ही म्हणाल या हॉटेलवाल्याला नक्की झालंय तरी काय? या व्हायरलं मेनूकार्डला १६०० लाईक्स मिळाले असून नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no flitring with cashier no free advice irani cafe in pune has a hilarious menu card