'स्कूल बंद, फी बंद; पालकांनी सोशल मीडियावर छेडले आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

पालकांनी सोशल मीडियाद्वारे सुरु केलेल्या या चळवळीत विद्यार्थ्यांनी 'स्कूल बंद फी बंद' असा संदेश देणारे फलक हाती घेतलेली छायाचित्रे अपलोड करण्यात आली आहेत. देशभरातील वेगवेगळ्या शहरातील पालक या चळवळीत सहभागी झाले असून ट्विटरद्वारे आपल्या मागणीसाठी दाद मागत आहेत.

पुणे :सर्वत्र सध्या शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. मात्र तरीही शाळा वर्षभराचे शुल्क आकारत असून शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावला जात आहे. हे चित्र केवळ पुणे, मुंबई किंवा राज्यापुरते मर्यादित नव्हे, तर संपूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी ही परिस्थिती असल्याचे दिसून येते. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कोणतीही पावले उचलली जात नाही. अखेर पालकांनी सोशल मीडियावर पूर्ण शुल्क घेण्याविरोधात चळवळ सुरू केली आहे. 'स्कूल बंद फि बंद' हा हॅशटॅग वापरून पालकांनी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले आहे.

"अनेक शाळा ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली पालकांची लूटमार करत आहेत. नियमित शुल्कासह ऑनलाइन तासाचेही शुल्क आकारले जात आहे. कोरोनाच्या संकट काळात पगार कपात होत असल्याने आधीच पालकांच्या खिशाला कात्री लागली असून त्यात या शुल्काची भर पडत आहे", असे गृहिणी वर्षा जाधव यांचे म्हणणे आहे.

नोकरदार असणाऱ्या प्रशांत चौधरी यांनी सरकारने मध्यस्थी करावी, असे मत मांडले आहे. ते म्हणाले,"सद्यपरिस्थितीत शाळा नियमित शुल्क घेत आहेत. त्यामागे असणारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार, अन्य खर्च ही कारणे आहेत. हे मान्य आहे. त्यामुळे सरकारने मध्यस्थी करून या प्रश्नावर तोडगा काढावा,"

पालकांनी सोशल मीडियाद्वारे सुरु केलेल्या या चळवळीत विद्यार्थ्यांनी 'स्कूल बंद फी बंद' असा संदेश देणारे फलक हाती घेतलेली छायाचित्रे अपलोड करण्यात आली आहेत. देशभरातील वेगवेगळ्या शहरातील पालक या चळवळीत सहभागी झाले असून ट्विटरद्वारे आपल्या मागणीसाठी दाद मागत आहेत.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No School and No Fees agitation started by the parents on social media