Water Supply : पुणेकरांनो, पाणी कपात होणार नाही; जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

खडकवासला प्रकल्पातील धरणसाठा पाहून पुणे शहरासाठी अतिरिक्त पाणी वापरण्याचा निर्णय सध्या सुरू असल्याप्रमाणेच ठेवला आहे.
Khadakwasala Water Project
Khadakwasala Water Projectsakal
Updated on

पुणे - पुण्याच्या पाणी वापरामध्ये कपात झालेली नाही. खडकवासला प्रकल्पातील धरणसाठा पाहून शहरासाठी अतिरिक्त पाणी वापरण्याचा निर्णय सध्या सुरू असल्याप्रमाणेच ठेवला आहे. जलसंपदा विभागाकडून महापालिकेला फेब्रुवारीपासूनच पाणी कपातीचा इशारा दिला होता.

परंतु, शनिवारी (ता. १) झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत शहरातील पाणी वापराबाबत कुठलीही कपात केली नसल्याची माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. परिणामी पुण्यासाठी महापालिकेला २१ टीएमसी पाणी मिळणार आहे.

पुणे शहर व ग्रामीण भागातील पाण्याच्या नियोजनासाठी कालवा समितीची बैठक झाली. त्यानंतर विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, खासदार, आमदार, महापालिका व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी यशदा येथे झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त पाणी वापरण्यात महापालिकेला नोटीस देण्याची सूचना विखे यांनी केली होती. त्यानंतर विखे यांच्यावर पुण्यातून जोरदार टीका झाली. पुण्यासाठी वापरत असलेल्या अतिरिक्त पाण्याच्या थकबाकीचे दोनशे कोटी रुपये मार्चअखेरपर्यंत महापालिका देणार असल्याची माहिती विखे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘धरणामध्ये सध्या पाणीसाठा पुरेसा असल्याने कोणतीही पाणी कपात करण्यात येणार नाही. जलसंपदा विभागाने मंजूर केलेला ११.६० टीएमसी पाणीसाठा त्यासह महापालिका नेहमीप्रमाणे उचलत असलेले अतिरिक्त ७.९५ टीएमसी पाणी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, भामा आसखेड धरणातून एक टीएमसी आणि पवना धरणातून ०.६० टीएमसी पाणीदेखील देण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.

महापालिका वापरत असलेल्या अतिरिक्त पाण्यासंदर्भात जलसंपदा विभाग व महापालिका यांच्याबरोबर पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, अशी माहिती विखे यांनी दिली. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले.

‘वाढती लोकसंख्येमुळे जादा पाणी’

महापालिका पाण्याचा खूप वापर करत असून, याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व आमदार व दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पुढील आठवड्यात होईल. शहरासह ग्रामीण भागालादेखील पाणी पुरवणे जलसंपदा विभागाचे काम आहे. महापालिका अतिरिक्त पाणी वापर करत असल्यास त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पाण्यावर होऊ शकतो.

याबाबत शेतकरी कायदेशीर लढा देऊ शकतात, म्हणून त्यातून तोडगा काढावा लागणार आहे. शहरात वाढत असलेली लोकसंख्या लक्षात घेता अतिरिक्त पाणी द्यावे लागणार आहे. मात्र, शहराला करण्यात येत असलेला पाणीपुरवठा व त्यावर करण्यात येणारी प्रक्रिया यात विसंगती असल्याने त्यावर निर्णय होणे गरजेचे असल्याचे विखे यांनी सांगितले.

पवार-जानकरांचा एका गाडीतून प्रवास

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. पुण्यातील शासकीय निवासस्थान ते विधान भवनापर्यंत जानकर यांनी पवार यांच्याबरोबर प्रवास केला. त्यामुळे जानकर यांच्या पक्ष बदलाबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर जानकर यांनी ‘मी माझ्या मतदारसंघातील कामानिमित्त पवार यांना भेटलो’ असे स्पष्टीकरण दिले.

कालवा समितीच्या बैठकीला उपस्थिती राहिल्यानंतर आमदार जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी तुम्ही अजित पवार यांच्याबरोबर जाणार का? या प्रश्नावर जानकर म्हणाले, ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार आहे. आजची सर्वांत महत्त्वाची चर्चा नीरा उजवा कालव्याच्या पाणी सोडण्याबाबत झाली.’

  • १७.११ टीएमसी - खडकवासलामधील सध्याचा पाणीसाठा

  • १२.०६ टीएमसी - पुणे महापालिकेने आतापर्यंत वापरलेले पाणी

  • ७ टीएमसी - आणखी लागणारे पाणी (अंदाजे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com