दीड दिवसात नॉन क्रिमिलेअर दाखला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

पिंपरी - ‘सरकारी काम आणि थोडा वेळ थांब, हे सर्वश्रुत आहे. कामासाठी नागरिकांचे हेलपाटे ठरलेले असतात. मुलाच्या नॉन क्रिमिलेअर दाखल्यासाठी धडपडणारे निगडी-त्रिवेणीनगर येथील वाहनचालक तानाजी जाधव यांनादेखील असा अनुभव आला. सांगितलेल्या तारखेला त्यांना दाखला न मिळाल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल पाठविला. त्यानंतर त्याबाबत तत्काळ सूत्रे हलली. अवघ्या दोनच दिवसांत त्यांना हा दाखला मिळाला. 

तानाजी जाधव यांना त्यांचा मुलगा रोहित याचा नॉन क्रिमिलेअर दाखला हवा होता. आकुर्डीतील खासगी महाविद्यालयात तो शिकतो आहे. महाविद्यालयाने 30 सप्टेंबरपर्यंत हा दाखला जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या; अन्यथा त्यांना जादा शुल्क भरावे लागणार होते. जाधव यांनी याबाबत शिवाजीनगर येथील नागरी सुविधा केंद्रात 29 ऑगस्टला अर्ज केला. त्यांना 22 सप्टेंबरला दाखला मिळेल, असे अर्ज भरल्यानंतर दिलेल्या पोचपावतीमध्ये नमूद होते. त्यानुसार ते 22 सप्टेंबरला शिवाजीनगर येथील नागरी सुविधा केंद्रात पोचले. मात्र, मॅडम आलेल्या नाहीत, असे कारण सांगून त्यांना दाखला देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पेजला भेट दिली. तिथे त्यांना officeofmla@gmail.com हा ई-मेल मिळाला. त्यावर त्यांनी त्याच दिवशी रात्री पावणेआठच्या सुमारास मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. दाखला न मिळाल्यास त्यांची होणारी अडचण त्यांनी त्यामध्ये नमूद केली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या ई-मेलची तत्काळ दखल घेण्यात आली. 24 सप्टेंबरला सकाळी हवेलीचे अतिरिक्त तहसीलदार प्रशांत बेड्‌से यांनी जाधव यांना ई-मेल पाठवून प्रमाणपत्राबाबत माहिती मागविली. तसेच, त्याच दिवशी दुपारी तीनच्या सुमारास तानाजी जाधव यांना प्राधिकरण येथील तहसील कार्यालयात बोलावून त्यांच्या मुलाचा दाखला सुपूर्त करण्यात आला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविल्यानंतर मुलाचा नॉन क्रिमिलेअर दाखला मला अवघ्या दीड दिवसात मिळाला. हे माझ्यासाठी स्वप्नवतच होते. मुख्यमंत्री कार्यालयातून तत्काळ कार्यवाही झाल्याबद्दल मी त्यांना ई-मेल पाठवून त्यांचे आभार मानले. 
- तानाजी जाधव, वाहनचालक

Web Title: non criminal certificate