नोव्हेंबरच्या पावसाची बातमी

नोव्हेंबरच्या पावसाची बातमी
Published on: 

नोव्हेंबरच्या सुरुवातीला तापमानात घट

रब्बीच्या पेरण्यांसाठी पाऊस आवश्यक

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ : परतीच्या पावसाची वाट पाहण्यात ऑक्टोबर महिना गेला. परतीचा पाऊस न आल्याने रब्बीच्या पेरण्यांवर परिणाम झाला आहे. ज्यांनी पेरणी केली आहे, ते पावसाची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. ज्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या थांबविल्या आहेत, त्यांच्यासाठीही पाऊस आवश्यक आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी कमाल तापमानात जवळपास तीन अंश सेल्सिअसने घट झाली होती. तापमानातील घट, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे पावसाची अपेक्षा अजूनही कायम आहे.
ऑक्टोबर महिन्यात तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला होता. ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (ता. ३१) सोलापुरात ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्या तुलनेत नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी सोलापूरचे तापमान ३३.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. जवळपास तीन अंश सेल्सिअसची घट झाली आहे. किमान तापमानाचा पाराही २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू लागल्याने वातावरणातून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आर्द्रता वाढल्याने वातावरणात कमालीचा उकाडा व दमटपणा वाढला आहे. यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आतापासूनच उद्भवू लागला आहे.

नोव्हेंबरच्या पावसाची सोलापूरला साथ
सोलापूर शहर व जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात पाऊस हजेरी लावत असल्याच्या आतापर्यंतच्या नोंदी आढळतात. या महिन्यात १० ते १०० मिलिमीटरपर्यंत सरासरी पाऊस यापूर्वी झालेला आहे. आता काही शेतकऱ्यांनी हवेतील गारव्यावर, पडणाऱ्या धुक्यावर व पावसाच्या आशेवर रब्बी पिकांची पेरणी केली आहे. पेरणी झालेल्या पिकांसाठी नोव्हेंबरमधील पावसाची आवश्यकता आहे. या महिन्यात पाऊस झाल्यास पेरलेल्या ज्वारीतून किमान जनावरांसाठी चारा तरी उपलब्ध होणार आहे.

नोव्हेंबरचे वातावरण आणि सोलापूर
- सर्वाधिक कमाल तापमान : ३६.१ अंश सेल्सिअस (७ नोव्हेंबर १८९६)
- सर्वाधिक किमान तापमान : ४.६ अंश सेल्सिअस (२७ नोव्हेंबर १९६४)
- २४ तासांतील सर्वाधिक पाऊस : १०८.८ मिलिमीटर (१० नोव्हेंबर १९८५)
- नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस : २३५ मिलिमीटर (२०१९)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.