सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांचे एकत्रित प्रयत्न; विद्यार्थी परतणार मायदेशी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

परदेशात अडकलेले विद्यार्थी किंवा नोकरदार यांच्यासाठीची विमान उड्डाणे मुंबई किंवा महाराष्ट्रात उतरविण्यासाठी आवश्यक असलेले संपूर्ण सहकार्य करण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे.

पुणे - परदेशात अडकलेले विद्यार्थी किंवा नोकरदार यांच्यासाठीची विमान उड्डाणे मुंबई किंवा महाराष्ट्रात उतरविण्यासाठी आवश्यक असलेले संपूर्ण सहकार्य करण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य यांनीही परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांच्याशी संपर्क साधत या बाबत महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याची भूमिका स्पष्ट केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दुबई, संयुक्त अरब अमिरती, रशिया, युक्रेन, किर्गिस्तान, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स आदी विविध देशांत महाराष्ट्रातील विद्यार्थी, नोकरदार कोरोनाच्या संकटामुळे अडकले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परतायचे आहे, परंतु, मुंबईत फ्लाईट उतरत नाही, असा गैरसमज पसरला आहे. त्यामुळे त्यांच्यात भीती निर्माण झाला आहे.

परदेशातील अनेक देशांत लॉकडाउन अजून कायम आहे. त्यामुळे तेथील शिक्षण संस्था, कंपन्या, कारखाने बंद आहेत. तेथे असलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांकडील पैसे संपत आले आहेत, काहीजणांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढत आहे. त्यामुळे त्यांनी खासदार सुळे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र सरकार यांच्याशी ट्विटरच्या माध्यमातून संपर्क साधत मदत करण्याची विनंती केली आहे. 

मुंबईत विमान उतरविले जात नाही, असा गैरसमज तेथील काही दूतावासांतही पसरला आहे. त्याबाबत सुळे यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांच्याशी संपर्क साधून परदेशातील विमाने उतरविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आवश्यक ते सहकार्य करीत आहे, असेही नमूद केले आहे. या बाबत सुळे म्हणाल्या, परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारबरोबर सहकार्य करण्यास तयार आहे. त्यासाठी आवश्यक ती तयारी, नियोजनही महाराष्ट्र सरकार करीत आहे. सद्यस्थितीत त्या लोकांना त्यांच्या-त्यांच्या गावी पोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्ऩशील आहे. अमेरिका, इंग्लंड, श्रीलंका, अफगनिस्तान आदी देशांतील विमाने मुंबई, पुण्यात या पूर्वीही उतरली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

 
पर्यावरण मंत्री ठाकरे यांनीही परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत, ऑपरेशन वंदेमातरमतंर्गत 7 जूनपासून सुरू होणाऱया तिसरय़ा टप्प्यासाठी महाराष्ट्रात येणाऱया विमानांसाठी सहकार्य करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे प्रयत्न करेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

अडकलेल्या भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने ऑस्ट्रेलियातील विविध शहरांतून 12 विमानांची उड्डाणे देशात होतील, असे नियोजन केले आहे. मात्र, त्यात महाराष्ट्रातील एकाही शहराचा समावेश नसल्याचे काही नेटिझन्सनी ट्विटरवर निदर्शनास आणले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now foreign flights will also arrive at airports in Maharashtra