बारामतीच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत वाढ

मिलिंद संगई
Thursday, 24 September 2020

बारामतीत गेल्या 24 तासात विविध तपासण्यांमध्ये 92 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले.

बारामती : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोनाचा उंचावलेला आलेख एकीकडे कमी होत असताना ग्रामीण भागाचा आलेख पुन्हा उंचावू लागला आहे. बारामतीत गेल्या 24 तासात विविध तपासण्यांमध्ये 92 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. यात विशेष म्हणजे तालुक्यातील काटेवाडी येथे केलेल्या 199 संशयितांच्या रॅपिड अँटीजेन तपासणीत 22 रुग्ण पॉझिटीव्ह तर नीरावागज येथे केलेल्या तपासणीत एक जण पॉझिटीव्ह आढळला. 

दरम्यान शहर व तालुक्यातील रुग्णांच्या मिळून बुधवारी 205 आरटीपीसीआर व 97 अँटीजेन अशा एकूण 302 रुग्णांच्या तपासण्या झाल्या. यात आरटीपीसीआर मधील 44 तर रॅपिडमधील 24 तसेच प्रलंबित असलेल्या तपासण्यामधील एक रुग्ण मिळून 69 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. यात तब्बल 41 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. या शिवाय काटेवाडी व नीरावागज येथील 23 म्हणजेच ग्रामीण भागातील एकूण 64 रुग्ण गेल्या 24 तासात पॉझिटीव्ह आढळले आहेत.
 
बाहेरगावाहून येणा-या प्रत्येकाची तपासणी अनिवार्य करण्याबाबत प्रशासन अद्यापही उदासीन असल्याचेच चित्र आहे. दररोज आता हजारो लोक बाहेरगावी प्रवास करुन येतात. त्यांच्याकडून कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर तपासणी नाकी उभारुन बाहेरुन येणा-या प्रत्येकाची तपासणी करणे, त्यांच्या नोंदी ठेवण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
 
दृष्टीक्षेपात बारामतीचा आढावा (गुरुवार 24 सप्टेंबर 2020)

•    आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या                    2879
•    उपचाराखाली असलेले रुग्ण                          877
•    आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण        69
•    पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण     461
•    सौम्य लक्षणे असलेले रुग्ण                            293
•    मध्यम लक्षणे असलेले                                    56
•    ऑक्सिजनवर असलेले रुग्ण                            49
•    व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण                             18
•    बरे झालेले एकूण रुग्ण                               1933

दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती

•    रुई ग्रामीण रुग्णालय                       26
•    सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय              74
•    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय      143
•    नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर      38
•    नटराज प्रेरणा कोविड सेंटर               22
•    बारामती हॉस्पिटल                          31
•    विविध खाजगी रुग्णालय                 108
•    घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या    430
•    पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण       5

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients in rural areas of Baramati is increasing