#NurseryAdmissions बालवाडी प्रवेशासाठी लाखोंच्या घरात शुल्क

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

वीस हजारांपासून ते लाखापर्यंत शुल्क 
छोट्या बालवाडीत वर्षाला २० ते २५ हजार रुपये शुल्क आहे. काही जुन्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २० ते ४० हजारांपर्यंत शुल्क आहे. एका वर्षाचे शुल्क डोनेशन म्हणून घेतले जाते. नामांकित संस्थांच्या बालवाडीमध्ये ५० हजार ते सव्वा लाखापर्यंत शुल्क सांगितले जाते. त्यामध्ये स्कूल बस, गणवेश, पुस्तके, उपक्रम व कार्यक्रमांचे शुल्क, बिल्डिंग फंड आदीचा समावेश असतो.

पुणे - मुलांना चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू झाली आहे. विविध संस्थांमध्ये जाऊन चौकशी करून शुल्क, डोनेशन किती, याबाबत माहिती घेतली जात आहे. मात्र, लाखाच्या जवळपास असणारे आकडे ऐकून ‘आपल्या बाळाचे कसे होणार’ हा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. कायद्याचे बंधन नसल्याने संस्था अव्वाच्या सव्वा शुल्क घेत असल्याने पालकांना चिंतेने ग्रासले आहे. 

सर्व शिक्षण कायद्यानुसार पाल्याचे वय सहा पूर्ण झाल्यानंतर पहिलीला प्रवेश दिला पाहिजे. पूर्वी घराजवळील बालवाडीत मुलाला चौथ्या किंवा पाचव्या वर्षी दाखल केले जायचे; परंतु आता अडीच वर्षे होताच प्ले ग्रुपमध्ये दाखल करतात. त्यानंतर तीन वर्षाचा झाला की नर्सरीमध्ये प्रवेश होतो. अनेक मोठ्या शाळांनी त्यांचे पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू केले. त्यामध्ये ज्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांनाच पुढे पहिलीला प्रवेश मिळतो. थेट पहिलीत बाहेरच्यांना प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला जातो. मात्र, मोठ्या शाळांचे शुल्क पालकांना परवडत नाही. 

जून २०२० मध्ये सुरू होणाऱ्या शाळांसाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरातील सर्वच शाळांमध्ये बालवाडी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शाळांनी ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. तर काही शाळांमध्ये ऑफलाईन अर्ज उपलब्ध केले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पहाटेपासून पालक अर्ज घेण्यासाठी रांगेत उभा रहात असल्याचे चित्र काही शाळांमध्ये दिसून येत आहे.

डोनेशन दुसऱ्याच्या नावाने
बालवाडीला प्रवेश देताना संस्था पालकांकडून डोनेशन घेतात. त्यासाठी ते अधिकृत ई-मेल व मेसेज पाठवतात. मात्र डोनेशनचा चेक किंवा डीडी हे प्रवेश घेणाऱ्याऐवजी दुसऱ्याच्या नावाने भरायला लावतात. त्यामुळे प्रवेशासाठी डोनेशन घेतले नाही, असे सांगण्यास संस्था मोकळ्या रहतात. 

माझ्या मुलीली घराजवळील चांगल्या संस्थेच्या बालवाडीत प्रवेश द्यायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरला आहे. पण शुल्क ६० हजार रुपये असून त्यावर डिपॉझिट म्हणून १ लाख रुपये मागितले आहेत. हे पैसे भरले तरच प्रवेश निश्‍चित होणार आहे. कमी शुल्क असलेल्या संस्था घरापासून लांब असल्याने याच संस्थेत प्रवेश द्यावा लागणार आहे.
- प्रमोद जोशी, पालक, धायरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nursery Admissions admission fee