रोपवाटिका व्यवसायातून स्वयंरोजगाराची संधी

रोपवाटिका व्यवसायातून स्वयंरोजगाराची संधी
Published on: 

रोपवाटिका व्यवसायातून
स्वयंरोजगाराची संधी

नाशिक जिल्ह्यातील ४० युवकांचे २५ दिवसीय प्रशिक्षण पूर्ण

ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक ः रोपवाटिका व्यवसायातून ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिक आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५ दिवसीय प्रशिक्षण पूर्ण झाले. या निवासी प्रशिक्षणात जिल्ह्यातील ४० युवकांनी सहभाग घेतला. रोपवाटिका उभारणीपासून दर्जेदार रोपांची निर्मिती आणि व्यवसाय व्यवस्थापनापर्यंतचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले.
२८ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र, नाशिक येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान रोपवाटिकेसाठी जागेची निवड, नियोजन, रोपवाढीसाठी माध्यमनिर्मिती, निर्जंतुकीकरण, बीजप्रक्रिया तसेच बियांपासून आणि शाखीय पद्धतीने रोपांची निर्मिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आंबा, पेरू, चिकू, डाळिंब, द्राक्ष, अंजीर, आवळा आणि बोर या फळपिकांच्या कलम पद्धती, डोळे भरणे आणि ऊतीसंवर्धन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. भाजीपाला व शोभिवंत वनस्पतींची रोपवाटिका, आधुनिक अभिवृद्धी गृहांची उभारणी व देखभाल, सिंचन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, सेंद्रिय खतनिर्मिती, हिरवळ व्यवस्थापन आणि बोनसाई निर्मिती या विषयांचाही प्रशिक्षणात समावेश होता. प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळावा, यासाठी व्यावसायिक रोपवाटिकांना भेटी तसेच कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि नारायणगाव येथे अभ्यास दौरे आयोजित करण्यात आले.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिकचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद उपस्थित होते. व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके, उद्यानविद्या विषयतज्ज्ञ हेमराज राजपूत आणि विषयतज्ज्ञ राजाराम पाटील उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
उद्यानविद्या विषयतज्ज्ञ डॉ. हेमराज राजपूत यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षणार्थी माया शिंदे, कृष्णा बिडगर, संपत महाले, किरण डावखर आणि सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. प्रकाश कदम यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी शरद माळी, संदीप दळवी, हृषीकेश पवार आणि हर्षल काळे यांनी सहकार्य केले.

व्यवसाय उभारणीचेही धडे
रोपवाटिका व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने, भांडवली खर्चाचे अंदाजपत्रक, आर्थिक नियोजन, वार्षिक कामांचे नियोजन, निविष्ठांची उपलब्धता, रोपे व कलमांची विक्री, जाहिरात आणि प्रदर्शनांमधील सहभाग याबाबतही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. व्यवसायाशी संबंधित शासकीय धोरणे व नियमांची माहिती देण्यात आली.

फोटो ओळी ---
नाशिक ः प्रक्षेत्र भेटीदरम्यान रोपवाटिकेत भाजीपाला रोपनिर्मितीची माहिती देताना हेमराज राजपूत. या वेळी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com