नानासाहेब पेशव्यांच्या राजकीय, लष्करी हालचालींचा वेध 

गणाधीश प्रभुदेसाई  
Wednesday, 30 September 2020

डॉ. उदय कुलकर्णी यांच्याकडून अभ्यासपूर्ण दस्तावेज 

पुणे : ""बचेंगे तो और भी लडेंगे'' या उद्‌गारांमुळे इतिहासात आजरामर झालेल्या दत्ताजी शिंदे यांना नानासाहेब पेशवे यांनी पाठविलेले स्वहस्ताक्षरातील पत्र प्रथमच उजेडात आले आहे. "The Extraordinary Epoch Of Nanasaheb Peshwa' या डॉ. उदय कुलकर्णी यांच्या पुस्तकात ते समाविष्ट करण्यात आले आहे. अठराव्या शतकातील मध्यास भारतात घडलेल्या अनेक राजकीय व लष्करी हालचालींचे संदर्भासह विवरण डॉ. कुलकर्णी लिखित पुस्तकातून पाहायला मिळते. या पुस्तकाचे प्रकाशन मध्यप्रदेशमधील मंत्री यशोधरा राजे शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. 1736 ते 1761 या पेशवे कालखंडातील हिंदुस्थान कसा होता, हे अभ्यासण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठा साम्राज्याचा प्रसार अटकपासून कावेरीपर्यंत व गुजरातपासून बंगालपर्यंत झाला. यावेळी राज्यात प्रधानपदी नानासाहेब पेशवे होते. मराठ्यांच्या या काळातील उलाढाली व्यतिरिक्त युरोपीयनांचा कर्नाटक व बंगालमधील प्रवेश यावर देखील या पुस्तकात बरीच माहिती वाचायला मिळते. मराठी, इंग्रजी, फार्सी, पोर्तुगीज व फ्रेंच साधनांचा उपयोग डॉ. कुलकर्णी यांनी या पुस्तकासाठी केला आहे. डॉ. कुलकर्णी यांचे अठराव्या शतकावरील हे सहावे पुस्तक आहे. भारतीय इतिहास व विशेषतः अठराव्या शतकातील मराठा इतिहासावर त्यांनी अभ्यास केला आहे. 

संजीव धुरंधर यांचा सन्मान; अमेरिकन फिजिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड

डॉ. कुलकर्णी यांनी मार्च 2018 मध्ये पुस्तकासाठी अभ्यासाला सुरुवात केली. मे 2018नंतर त्यांनी दुसरे पुस्तक हाती घेतल्याने या पुस्तकाचे काम थांबले. पण नंतर फेब्रुवारी 2020मध्ये काम पुन्हा सुरू करून ते पूर्ण केले व पुस्तक इतिहास अभ्यासकांसाठी उपलब्ध केले. अभ्यासकांसाठी हा एक संदर्भग्रंथ असून 500पानी पुस्तकात तब्बल 38 प्रकरणे आहेत. 27 नकाशे, छायाचित्रे, पत्रे याचाही वापर करून परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. नानासाहेब पेशव्यांच्या काळातील वादग्रस्त व संघर्षमय प्रकरणांचा उल्लेखही या पुस्तकात आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी कर्नाटक, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल व इंग्लंडमध्येही त्यांना प्रवास करावा लागला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नानासाहेबांच्या पत्रात काय आहे? 
नानासाहेब पेशवे यांनी दत्ताजी शिंदे यांना 1757 मध्ये लिहिलेले स्वहस्ताक्षरातील पत्र डॉ. उदय कुलकर्णी यांनी लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमधून मिळविले आहे. त्यात पेशवे दत्ताजी शिंदे यांना ""इब्राहिम खान गारदी यास नोकरीवर ठेवून घ्यावे'' असे लिहिताना दिसतात. नंतर इब्राहिम खान पानिपत येथे मराठा सैन्याबरोबर तोफखाना घेऊन गेला होता. 

 

राजकारणात बरोबर, चूक काही नसतं. म्हणून या पुस्तकात पेशवेकालीन इतिहासातील घटनांवर कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. ज्या घटना घडल्या त्यांची पार्श्‍वभूमी, कारणे व इतर माहिती दस्तावेजाचा संदर्भ देऊन दिलेली आहे. अभ्यासकांनी त्याच्याआधारे निष्कर्ष काढावा. 
- डॉ. उदय कुलकर्णी, लेखक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Observing the political and military movements of Nanasaheb Peshwe