कलेतून उलगडले नात्यातील भावबंध

कलेतून उलगडले नात्यातील भावबंध

सौरभ काडगावकर आणि धनश्री काडगावकर
शास्त्रीय संगीत गायक सौरभ काडगावकर आणि अभिनेत्री धनश्री काडगावकर हे बहीण-भाऊ आपापल्या क्षेत्रातील आजचे आघाडीचे तरुण कलावंत म्हणून ओळखले जातात. सौरभ म्हणाला, ‘मी धनश्रीहून दीड वर्षानं मोठा. वयाचे अंतर फार नसल्यामुळे जुळ्या भावंडांसारखंच आम्ही वाढलो. आता ती तिच्या अभिनय क्षेत्रात खूप व्यग्र असते. मी गाण्याच्या मैफली, ध्वनिमुद्रण, रियाझ, विद्यार्थ्यांना शिकवणं या सगळ्यात गढलेला असतो. अशातही निरनिराळ्या संदर्भात आम्हाला घरी एकत्र असतानाची कुठली ना कुठली आठवण येत असते.’ कधी ती हळवी असते तर कधी खुदकन्‌ हसवणारी. लहानपणी कॉलनीतल्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर मिळून आम्ही किल्ला करायचो. फटाके वाजवायचो.  फराळाच्या चवीचं वर्णन एकमेकांना सांगत तो फस्त करायचो. आता प्रत्येक दिवाळीला घरी असतोच, असं नाही.’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धनश्रीने सांगितले की, सौरभ दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांसाठी बरेचदा बाहेरगावी असतो. मी चित्रीकरणात असते किंवा दोन दिवस घरी. माझ्या लग्नानंतर सौरभमध्ये माझ्यासाठी कमालीचा हळवेपणा आलेला मला जाणवतो. लहानपणी भाऊबिजेच्या दिवशी पप्पा त्याला काही पैसे द्यायचे ओवाळणी म्हणून मला देण्यासाठी. तेव्हा त्यांनी दिलेल्या पैशांमधला एक चतुर्थांश, एक पंचमांश भागच तो मला द्यायचा. मी विचारलं तर तुला कशाला हवेत? एवढे पुरेत की, असं म्हणायचा. पप्पा त्याला किती पैसे ओवाळणीत घालायला देत आहेत, याच्यावर मी बारीक लक्ष ठेवून असायचे. पण मोठा होताना तो बदलत गेला. माझ्या लग्नानंतर तर तो मैफलींसाठी किंवा फिरायला म्हणून जिथे कुठे जाईल, तिथल्या खास वस्तू मुद्दाम माझ्यासाठी आणून आश्‍चर्यचकित करतो. त्याच्या गाण्याबद्दल मला त्याचा खूप अभिमान वाटतो. त्याचं लोकांकडून कौतुक ऐकतेच, पण एका दिवाळी पहाट कार्यक्रमात मी समोर बसून त्याचं गाणं ऐकलं. मागच्या वर्षी घरीच दिवाळी पहाट निमित्त सौरभ गायला. बाहेरच्याप्रमाणेच आतही लक्ष लक्ष दिवे उजळल्यासारखं वाटलं.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नुपुर दैठणकर - निनाद दैठणकर
अभिनय, गायन, वादन व नृत्य या कलाप्रांतांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या बहीण व भावांच्या अनेक नामांकित जोड्या आहेत. यंदाच्या दिवाळीत भाऊबिजेच्या निमित्ताने भरतनाट्यम नृत्यांगना नूपुर दैठणकर-बाग आणि संतूरवादक निनाद दैठणकर या कलावंत भावंडांनी आपल्या नात्यातील भावबंध उलगडले आणि साकारला एक भावनिक आविष्कार.... 

युवा भरतनाट्यम नृत्यांगना नूपुर दैठणकर-बाग व संतूरवादक निनाद दैठणकर या भावंडांना आपापल्या कलेच्या स्पर्शानं भाऊबिजेचं वातावरण उजळून टाकावंसं वाटतं.  

नूपुर म्हणाली, ‘‘एकदा एका वाहिनीवर दिवाळी निमित्ताने आमची मुलाखत सुरू होती. मुलाखतकाराने अचानक निनादला विचारलं की, तू तुझ्या बहिणीसाठी तुझ्या कलेच्या माध्यमातून काय भेट देशील? त्यावर निनादने उत्स्फूर्तपणे एक रचना सादर केली.’’ ही माझ्या ताईला समर्पित, असं तो म्हणाला. त्यावर मुलाखतकाराने मला विचारलं की, तुम्ही तुमच्या कलेतून याबद्दल कशी प्रतिक्रिया द्याल? मी म्हटलं की, या रचनेवर मी नृत्यातून भावनाविष्कार करीन. आम्हा दोघांना कुठलीही पूर्वसूचना नसताना, आयत्या वेळी सांगितल्यावर परस्परांशी बोलून काही ठरवायची संधीही उपलब्ध नसताना आम्ही जे परस्परपूरक सादरीकरण केलं, त्याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं. आमच्या दृष्टीने ती बहीण-भाऊ या नात्याने एकरूपतेची पावती होती. 

निनादने आवर्जून सांगितलं की, ताई माझ्याहून साडेचार वर्षांनी मोठी आहे. ती कायमच मला खूप समजून घेऊन माझी काळजी घेत आली आहे. आमचे वडील डॉ. धनंजय दैठणकर हे संतूरवादक व आई डॉ. स्वाती भरतनाट्यम नृत्य कलावंत. ही दोन्ही आपापल्या क्षेत्रातील नावाजलेली माणसं. आमच्या बालपणापासून दोघांचे कार्यक्रमांचे दौरे असायचे. आम्ही घरी आजीसोबत असायचो. त्यावेळी ताई माझ्याकडे खूप लक्ष द्यायची. माझा अभ्यास घ्यायची. आम्हाला एकमेकांची खूप सवय आहे. एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत आहेत. मला कॉन्टिनेन्टल फूड आवडतं म्हणून ताई त्यातल्या कित्येक रेसिपीज शिकली. तिच्या लग्नानंतर मी जेव्हा तिच्या घरी जातो, तेव्हा मला आवडेल असा एखादा कॉन्टिनेन्टल पदार्थ बनवून ती मला सुखद धक्का देते. भाऊबिजेच्या एका दिवसापुरतं कशाला, आमच्यातलं नातं कलेच्या माध्यमातून आणखी घट्ट करण्यासाठी मला माझं संतूर आणि तिचं नृत्य यांच्या मिलाफातून कार्यक्रम करावेसे वाटतात. अर्थात तिलाही ते पटलं आहे. त्या दिशेने आता आम्ही प्रयत्न करत आहोत, असं निनादनं स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com