महाशिवरात्रीनिमित्त रताळ्याची आवक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

महाशिवरात्रीनिमित्त रविवारी बाजारात रताळ्याची आवक झाली. घाऊक बाजारात दर्जानुसार दहा किलोस 180 ते 200 रुपये भाव मिळाला.

मार्केट यार्ड - महाशिवरात्रीनिमित्त रविवारी बाजारात रताळ्याची आवक झाली. घाऊक बाजारात दर्जानुसार दहा किलोस 180 ते 200 रुपये भाव मिळाला. आकाराने मोठ्या असलेल्या करमाळा भागातील रताळ्यांना दहा किलोस 120 रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात 30 ते 40 रुपये विकला जात आहे. शुक्रवारी (ता. 21) महाशिवरात्र आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाजारात कराड, मलकापूर भागातून 500 पोती, करमाळा भागातून एक ट्रक रताळ्याची आवक झाली. कराड, मलकापूर भागांतील रताळी चवीला गोड, गावरान, आकाराने लहान आणि दिसायला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून त्याला जास्त मागणी असते. परिणामी, भावही जास्त मिळतो. येत्या दोन दिवसांत आणखी आवक वाढणार असल्याचे श्री छत्रपती शिवाजी अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. 

""गेल्या वर्षी दुष्काळाचा फटका बसल्याने रताळ्याचे उत्पन्न घटले होते. त्यामुळे आवक कमी झाली व जास्त भाव मिळाला होता. गेल्या वर्षी राज्यातील रताळ्याना किलोस 25 ते 30 रुपये भाव मिळाला होता. तो या वर्षी कमी मिळत आहे. दोन-तीन दिवसांत होणाऱ्या आवकेवरून किती भाव मिळेल, याचे चित्र स्पष्ट होईल,'' असे श्री छत्रपती शिवाजी अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी सांगितले. 

बाजारात पुढील दोन दिवसांत रताळ्यांना मागणी वाढेल. बाजारात अजून कर्नाटकातून रताळी दाखल झालेली नाहीत. येत्या काही दिवसांत ते बाजारात दाखल होतील. 
- अमोल घुले, उपाध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी अडते असोसिएशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the occasion of Mahashivratri Sweet Potato arrived in the market