esakal | मोकळ्या जमिनींचा गुंडाकडून ताबा
sakal

बोलून बातमी शोधा

Plot

मोकळ्या जमिनींचा गुंडाकडून ताबा

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे - बिबवेवाडी-गंगाधाम चौक परिसरात एका वृद्ध व्यावसायिकाने काही वर्षांपूर्वी ५-६ गुंठे जमीन (Land) घेऊन ठेवली. मात्र, तेथे बांधकामाला परवानगी नसल्याने व्यावसायिकाने परवानगी घेऊन होर्डिंग (Hording) लावले. मागील लॉकडाउनमध्ये काही जणांनी त्यांच्या जमिनीचा बेकायदा ताबा (Illegal Possession) घेतला. त्यासाठी ७० ते ८० लाखांची खंडणी मागितली. व्यावसायिकाने याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांकडे (Police) दाद मागितली. अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी सांगूनही पोलिसांनी ‘दिवाणी प्रकरण’ म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. अशा पद्धतीने ठिकठिकाणी गुंडांकडून मोकळ्या जमिनींचा बेकायदा ताबा घेण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच, ताबा सोडण्यासाठी खंडणी उकळण्यापासून जमीन बळकाविण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. (Occupancy of Vacant Lands by Gangstar)

सर्वसामान्य नागरिकांकडून घर बांधण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी शहरालगत छोटे-मोठे प्लॉट खरेदी केले जात होते. मात्र, वर्षानुवर्षे या जमिनी मोकळ्या राहिल्याने तेथील सराईत गुंडांकडून त्यावर बेकायदेशीर ताबा मारण्यास सुरुवात झाली. जागा मालकांकडून गुंड किंवा त्यांच्या मालकांना जाब विचारण्यात आला. तेव्हा, जमीन मालकांना ताबा सोडण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागितली जाते किंवा ती कवडीमोलाने घेऊन दुसऱ्यांना कोट्यवधी रुपयांना विकण्याचा प्रकार सुरू झाला. त्यास विरोध करणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या जात आहेत. संबंधित नागरिक दाद मागण्यासाठी पोलिसांकडे गेल्यानंतर तेथे ‘दिवाणी प्रकरण’ असल्याचे सांगून कारवाईकडे काणाडोळा केला जात असल्याचे नागरिकांचे अनुभव आहेत. अनेकजण खंडणी देऊन मोकळे झाले, तर काहींनी २-४ लाखात जमिनी विकून स्वतःचा जीव वाचविला. काहींच्या जमिनी गुंडांनी गिळंकृत केल्याच्याही घटना आहेत. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा: घरगड्यापेक्षा कमी पगार; विनाअनुदानित प्राध्यापकांची वेठबिगारी

इथे सुरू आहे बेकायदा ताबेमारी

कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, कात्रज, बिबवेवाडी, येवलेवाडी, उंड्री, पिसोळी, धनकवडी, महंमदवाडी, लोहगाव, खराडी, धायरी, नऱ्हे, आंबेगाव यांसह शहराच्या वेगवेगळ्या भागांत बेकायदा ताबेमारीचा प्रकार सुरू आहे.

बिबवेवाडी गंगाधाम परिसरातील माझ्या जागेवर काही लोकांनी बेकायदा ताबा घेतला. ताबा सोडण्यासाठी खंडणी मागितली. त्याबाबत मार्केट यार्ड पोलिसांकडे दाद मागितली. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केले. ताबा घेणाऱ्याने तो दाऊद गॅंगशी संबंधित असल्याचे सांगून जिवे मारण्याची धमकी दिली. तरीही पोलिसांनी दखल घेतली नाही.

- राजकुमार लोढा, वृद्ध बांधकाम व्यावसायिक

चंदननगर येथे जमिनींवर बेकायदा ताबेमारी सुरू होती. त्यांच्यावर कारवाई केली आहे. सर्वसामान्यांच्या जमिनींवर होणारी बेकायदा ताबेमारी खपवून घेणार नाही. पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनाही ताबेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

loading image