

प्रसन्नचित्त
सदराचे नाव- तिला मुक्त व्हायचंय
लेखक- डॉ. मृदुला आपटे (लोगो लावा)
-----------
मन काहे ना धीर धरे!
-----------
‘कोरोना’नंतर आपण सगळे स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊ लागलो. अनेक घरांत लोक म्हणू लागले- ‘आम्हाला थोडीशी ओसीडी आहे!’ ‘ओसीडी’ हा शब्द मुबलक प्रमाणात वापरला जात असला, तरी तिचे खरे रूप व होणारा त्रास सर्वांना माहिती नाही.
-----------
सोना चाळिशीच्या जवळ येऊन ठेपली होती. तिचं दहा वर्षांपूर्वी राकेशशी लग्न झालं होतं आणि त्यांना सात वर्षांचा मुलगा होता. सोना अनेक वर्षांपासून ‘ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर’ने (ओसीडी) त्रस्त होती. पण त्याचं कधी निदानच झालं नव्हतं. जेव्हा तिची स्थिती इतकी बिघडली की तिच्या समस्या मुलावर परिणाम करू लागल्या, तेव्हा राकेशनं तिला सायकियाट्रिस्टकडे नेलं. तिथे तिच्या ओसीडीचं निदान झालं.
डॉक्टरांनी तिला हा विकार समजावून सांगितला आणि औषधं दिली. शिवाय त्यांनी असा सल्ला दिला की सोनानं क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडे जाऊन सायकोथेरपीदेखील घ्यावी. कारण ओसीडीच्या उपचारांत औषधं आणि थेरपी दोन्ही एकत्र केल्यास चांगला परिणाम होतो.
राकेश थोडा हुकूमशाही स्वभावाचा होता. सोना वारंवार बेडशीट्स, कपडे वगैरे बदलायची किंवा भांडी वारंवार धुवून घ्यायची, तेव्हा प्रथम तो खूप रागावायचा. सुरुवातीला त्याला वाटायचं की ती फक्त स्वच्छता आणि नीटनेटकेपणामुळे जागरूक होऊन असं करते आहे. नंतर मात्र तो तिला चिडवू लागला, ‘‘तुला ओसीडी आहे... आपलं घर नेहमी स्वच्छ राहील!’’ त्या वेळीराकेश असं म्हणाला, तरी त्याला ओसीडी म्हणजे नेमकं काय हे कळलं नव्हतं. पुढेपुढे सोनाला आंघोळ करायला किंवा मुलाला शाळेसाठी तयार करायलाही तासन्तास लागू लागले.
काय आहे ‘ओसीडी’?
सोना आणि राकेश क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असलेल्या ऋताकडे आले, तेव्हा दोघेही कातावलेले, दुःखी आणि निराश झालेले होते. ऋताने त्यांना ओसीडीचं चक्र समजावून सांगितलं. तिनं सांगितलं की, ओसीडी ही एक वैद्यकीय समस्या आहे. त्यात वर्तनाशी निगडीत आणि विचारांशी संबंधित असे दोन्ही पैलू असतात.
रुग्णांना अनेकदा आपोआप विचित्र, वारंवार येणारे किंवा अनाहूत विचार येतात. त्यामुळे त्यांना प्रचंड अस्वस्थता आणि भीती वाटते. उदाहरणार्थ- ‘माझ्या मुलाला काही तरी होईल’ असा विचार येऊ शकतो. हा विचार पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन असतो. पण त्यामुळे तीव्र अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्थता कमी करण्यासाठी रुग्ण काही तरी कृती करतात. हे जवळजवळ अंधश्रद्धेसारखंच असतं. कुणी टेबलला वारंवार स्पर्श करतात किंवा कुणी अनेकदा हात धुतात. त्यामुळे काही वेळासाठी अस्वस्थता कमी होते, पण पुन्हा ती परत येते. कधी कधी आक्रमक किंवा लैंगिक विचारही येतात. यामुळे रुग्णांना भीती वाटते की ते ‘वेडे’ होत आहेत की काय.
ओसीडीचं स्वरुपच असं आहे की बहुतेक लोक याला फक्त एक वाईट सवय समजतात. पण ते त्यापेक्षा खूप जास्त आहे. रुग्णाला होणारी अस्वस्थता आणि त्रास इतका जबरदस्त असतो की इतर कोणालाही तो समजू शकत नाही. कधी कधी हे वारंवार येणारे आणि आपोआप होणारे विचार इतके तीव्र असतात आणि इतकी भीती निर्माण करतात की रुग्ण त्यांचा सामना करण्यासाठी विचित्र पद्धती वापरतात. स्वतःभोवती फिरणं, एखादी गोष्ट वारंवार लिहिणं, एखाद्या वस्तूला पुन्हा पुन्हा स्पर्श करणं किंवा मनातल्या मनात काही ‘दुरुस्त’ करण्याचा प्रयत्न करणं ही सगळी ओसीडीची लक्षणं असू शकतात.
समजून घ्यायला अवघड
या आपोआप येणाऱ्या विचारांना ‘ऑब्सेशन्स’ म्हणतात आणि त्यांमुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी रुग्णाकडून होणाऱ्या कृती किंवा मानसिक विधी यांना ‘कंपल्शन्स’ म्हणतात. ऋतानं सोना आणि राकेश दोघांनाही हे सर्व समजावून सांगितलं. राकेशला खूप राग आला. तो म्हणाला, ‘‘सोनाच्या आई-वडिलांनी मला फसवलं... लग्नापूर्वीच तिला ही ‘परफेक्शनिझम’ची समस्या होती, याची मला खात्री आहे.’’
ऋताने समजावले, ‘‘ओसीडी हा शब्द खूप लोक चुकीच्या अर्थानं वापरतात. नीटनेटक्या, स्वच्छ राहणाऱ्या किंवा ‘परफेक्शनिस्ट’ लोकांना ओसीडी आहे असे सर्रास म्हणतात. पण ते खरं नाही. ओसीडी असलेल्या व्यक्तींना त्यांच्या या समस्येमुळे खूप त्रास होतो. त्यांना ही स्वच्छता करायची किंवा वारंवार काही तरी करायची इच्छा नसते. पण त्यांचे विचार आणि त्यामुळे निर्माण होणारी भीती त्यांना भाग पाडते. ते स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवत नाहीत, पण भीती इतकी तीव्र असते की ते स्वतःला थांबवू शकत नाहीत.’’
त्या दोघांना ओसीडी समजावून सांगण्यासाठीच ऋताला अनेक सेशन्स घ्यावे लागले. तिने राकेशला सांगितलं की, कुटुंबीयांचा पाठिंबा नसल्यास मानसिक आरोग्याच्या उपचारांत अडचण येते.
शेवटी नियमित औषधं आणि ‘कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी’ (सीबीटी) यांमुळे सोनाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. तिला अजूनही काही अडचणी येत होत्याच, पण आता ती दैनंदिन कामं, दिनचर्या व्यवस्थित सांभाळू लागली. राकेशमध्येही खूप बदल झाला. आता तो ओसीडीबद्दल मोकळेपणानं बोलतो आणि ऋतानं सांगितलेली माहिती आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांना समजावून सांगतो.
मानसिक आरोग्याभोवती असलेला कलंक नाहीसा व्हावा यासाठी मात्र अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे असंच ऋताला वाटतं.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.