
विधानसभा 2019
पिंपरी - कधी जोरदार पाऊस, तर कडक ऊन... अशा वातावरणात सप्टेंबर महिना संपला. त्याच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. आता मंगळवारपासून ऑक्टोबरला प्रारंभ होत आहे. पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागणार आहे. दसरा, दिवाळी या सण, उत्सवांबरोबरच महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी आणि निवडणुकीचा प्रचार, मतदान व निकाल, अशी धामधूम बघायला मिळणार आहे. अर्थात, ऑक्टोबर ‘हीट’सोबत प्रचाराचे वातावरणही तापणार आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. उमेदवारी अर्जांचे वितरण २७ पासून सुरू आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ४) अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शनिवारी (ता. ५) अर्जांची छाननी होईल. सोमवारपर्यंत (ता. ७) माघार घेता येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचे वातावरण तापू लागेल. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात कोण? कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल, हे लवकरच स्पष्ट होईल. २१ ऑक्टोबरला मतदान असल्याने ४८ तास अगोदर अर्थात १९ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता प्रचार थांबवावा लागणार आहे. २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. सकाळी दहा वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. त्यामुळे विजयाची दिवाळी कोण साजरी करणार, हे स्पष्ट होईल. कारण, २५ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरवात होणार आहे.
नवरात्री, दसरा अन् कोजागरी
तिथीक्षय झाल्यामुळे वसुबारस व धनत्रयोदशी एकाच दिवशी अर्थात २५ ऑक्टोबरला आहे. नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन २७ ऑक्टोबरला आहे. सोमवारी (ता. २८) बलिप्रतिपदा आणि मंगळवारी (ता. २९) भाऊबीज आहे. सध्या आदिशक्ती आदिमाया देवीचा जागर अर्थात नवरात्रोत्सव सुरू आहे. २९ सप्टेंबरला घटस्थापना झाली असून, मंगळवार १ आॅक्टोबरला तिसरी माळ आहे. सोमवारी (ता. ७) नवरात्रोत्सवाचा समारोप होईल. मंगळवारी (ता. ८) दसरा अर्थात रावणदहन आहे. त्यानंतर १३ ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमा आहे.
महापुरुषांना अभिवादन
महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती २ ऑक्टोबरला आहे. या दिवसापासून संपूर्णतः प्लॅस्टिकबंदीचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारी केली आहे. स्वच्छता मोहिमेत देशात प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी शनिवारी (ता. १९) आहे. तर, देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबरला आहे.
शनिवारपासून आयंबिल ओळी
शनिवारपासून (ता. ५) जैन बांधवांच्या ‘आयंबिल ओळी’ आचरणाला प्रारंभ होत आहे. या काळात तेल, तूप, मैदा, साखर व मीठ या अतिसेवनामुळे शरीराला हानिकारक ठरणाऱ्या वस्तू वर्ज्य केल्या जातात. आयंबिलचा कालावधी आठ दिवसांचा असतो. या कालावधीत दिवसातून केवळ एक वेळेसच अन्न ग्रहण करायचे असते. तेही एकाच ताटात व एकाच जागेवर बसून घ्यायचे असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.