

ओडिशात भूस्खलनात १२ जण बेपत्ता
शोधमोहिमेसाठी जवान तैनात; चिखलाच्या ढिगाऱ्याखाली घरे गाडली
भुवनेश्वर/फुलबनी, ता. ३१ (पीटीआय) : अर्णव चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात गंजम आणि कंधमाल जिल्ह्यांच्या सीमेवरील एका गावात भूस्खलन होऊन १२ जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी ओडिशा सरकारने मोठी मोहीम उघडली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), ओडिशा आपत्ती जलद कृती दल आणि विशेष कृती गटाचे मिळून १७० जवान या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
विशेष मदत आयुक्त राजेश पी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरावरील या गावात २६ जण राहत होते. त्यापैकी १३ जण बचावले, तर उर्वरित १३ जण बेपत्ता झाले होते. बेपत्ता असलेल्यांपैकी एकाचा शोध लागला असून, अन्य १२ जणांचा शोध सुरू आहे. शुक्रवार रात्रीपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. गंजम जिल्ह्यातील भंजनगर तालुक्यातील बैबाली ग्रामपंचायतीच्या गिडीपाबाली गावात ही घटना घडली. अर्णव चक्रीवादळामुळे झालेल्या पावसात राज्यात भूस्खलनाच्या १० घटना घडल्या. दक्षिण ओडिशातील शेकडो गावांमध्ये पाणी शिरले आहे. शुक्रवारी कंधमाल जिल्ह्यात भूस्खलनात नऊ महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू झाला. गजपती जिल्ह्यातही एक मृतदेह आढळल्याची माहिती पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी गंजमसह पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये बचाव आणि मदतकार्याला वेग देण्यात आल्याचे सांगितले.
गिडीपाबाली गावातील बचावलेले १३ जण कंधमाल जिल्ह्यातील जी. उदयगिरीजवळील मदत केंद्रात आश्रयाला आहेत. त्यांच्यात दोन मुलांचाही समावेश असल्याचे जिल्हाधिकारी वेदभूषण यांनी सांगितले.
बचावलेल्या रिनीमा मल्लिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरावरून चिखलाचा मोठा ढिगारा कोसळल्याने घरे गाडली गेली आणि गाव उद्ध्वस्त झाले. काही जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले; मात्र त्यांच्यामागे येणारे काही जण मदत केंद्रापर्यंत पोहोचू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. सौदामिनी मल्लिक यांनीही त्यांचे काही नातेवाईक अद्याप बेपत्ता असल्याचे सांगत प्रशासनाकडे त्यांच्या बचावासाठी विनंती केली. बचावलेले नागरिक दगड लागल्याने जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन जखमी महिलांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्याची माहिती जी. उदयगिरीचे गटविकास अधिकारी सत्यनारायण मिश्रा यांनी दिली. दरम्यान, गंजम जिल्ह्यातील आस्का आणि अन्य भागांत मदतकार्य सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.