पुणे-पिंपरी चिंचवड मार्ग ठप्प; जुना मुंबई-पुणे रस्ता आहे पर्यायी मार्ग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

- मुळा नदीच्या पात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने आज सकाळ पासूनच नदीकाठच्या परिसरात पाणी शिरले होते.

- यामुळे स्थानिक रहिवाशांना इतरत्र स्थलांतरीत करण्यात आले आहे.
- पुणे शहरातून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी वाकडेवाडी मार्गे जुन्या पुणे-मुंबई मार्गाचा किंवा बाणेर रस्त्यावरून राधा चौकातून वाकड मार्गाचा वापर करावा.
 

औंध(पुणे) : पुणे व पिंपरी चिंचवडला जोडणारे सांगवी-स्पायसर, औंधमधील राजीव गांधी पुल व सांगवी फाटा-डिमार्ट पुल हे तिन्ही मुख्य पुलावरील वाहतूक बंद केली आहे.   यामुळे औंधच्या दिशेने पुणे- पिंपरी चिंचवड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुणे शहरातून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी वाकडेवाडी मार्गे जुन्या पुणे-मुंबई मार्गाचा किंवा बाणेर रस्त्यावरून राधा चौकातून वाकड मार्गाचा वापर करावा

मुळा नदीच्या पात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने आज सकाळपासूनच नदीकाठच्या परिसरात पाणी शिरले होते. यामुळे रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच औंध येथील सांगवीला जोडणारा महादजी शिंदे आणि पिंपरी चिंचवडला जोडणारा राजीव गांधी पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

''औंधमधील शिवाजी विद्यामंदीर शाळेपर्यंत पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद असल्याने नागरिकांनी या भागात जाण्याचे टाळावे,'' असे आवाहन पालिकेच्या औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदिप कदम आणि वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे यांनी केले आहे.

औंध येथील जकात नाका येथे तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचले आहे. तसेच राजीव गांधी पुल पाण्याखाली जाण्याची भिती निर्माण झाली होती. दरम्यान पाण्याचा विसर्ग वाढविला 'औंध' पुल बुडणार नाही पण, पुलाच्या आजूबाजूचा परिसर, सोसायट्यांमध्ये पाणी घुसेल, असे पोलिसांनी सांगितले

हे 'तीन' मुख्य पुल वाहतूकीसाठी बंद
- सांगवी ते स्पायसर कॉलेजला जोडणारा पुल पाण्याखाली गेला आहे. 
- औंधमधील राजीव गांधी पुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे वाहतूक अतिशय संथ गतीने सुरु आहे.
- सांगवी फाटयावरुन डिमार्टच्या दिशेने जाणाऱ्या पुलावरही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे हिंजवडी येथे जाणाऱ्या आयटीयन्सची तारांबळ उडाली आहे.
- औंध येथील महादजी शिंदे रोडवरील डी मार्ट शेजारील पुलाला भगदाड पडल्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old Mumbai-Pune highway road is an alternative route for Pune-Pimpri Chinchwad