अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी भाजपचा खासदारांना ‘व्हिप’
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.६ ः लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या नऊ आणि दहा तारखेला संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या खासदारांसाठी दोन दिवसांसाठी ‘व्हिप’ जारी केला आहे. सोमवारी (ता.९) आणि मंगळवारी (ता.१०) सर्व खासदारांनी सदनात उपस्थित राहावे, असे या ‘व्हिप’मध्ये म्हटले आहे.
अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. विरोधी पक्षांकडून कामकाजाच्या प्रारंभीच लोकसभा अध्यक्षांना हटविण्याच्या प्रस्तावावर चर्चा घेण्याची मागणी केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्तारूढ खासदारांची सदनातील उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे भाजपने आपल्या खासदारांसाठी ‘व्हिप’ जारी केला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी सदनाचे कामकाज चालविताना पक्षपातीपणा केला असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. ११८ विरोधी खासदारांच्या या प्रस्तावावर सह्या आहेत. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर बिर्ला यांनी कामकाजातून सहभाग काढून घेतला होता. जोपर्यंत प्रस्तावावर निकाल लागत नाही, तोवर कामकाज पाहणार नाही, असे त्यांनी खासगीत सांगितले होते. विशेष म्हणजे प्रस्तावावर सही करण्यास तृणमूल कॉँग्रेसने नकार दिला होता.
बिर्ला सत्ताधारी बाकावर
नियमानुसार प्रस्तावावर चर्चेवेळी अध्यक्षांच्या आसनावर बिर्ला बसणार नाहीत. ते सत्ताधारी सदस्यांसाठी असलेल्या बाकावर बसतील. प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याचा अधिकार त्यांना आहे. यापूर्वी जी. व्ही. मावळंकर (१९५४), हुकूम सिंह (१९६६) आणि बलराम जाखड (१९८७) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र हे तिन्ही प्रस्ताव बहुमताअभावी नामंजूर झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

