मनुष्यबळाअभावी रुग्ण संपर्कासाठी होतो विलंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctor
मनुष्यबळाअभावी रुग्ण संपर्कासाठी होतो विलंब

मनुष्यबळाअभावी रुग्ण संपर्कासाठी होतो विलंब

पुणे - ओमिक्रॉन विषाणूंचा (Omicron Virus) संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी ९५ टक्के नागरिक गृहविलगीकरणात आहेत. या नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी (Inquiry) करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात वॉर रूम (War Room) तयार केली आहे. परंतु, अपुऱ्या मनुष्यबळामुळे पॉझिटिव्ह (Positive) असलेल्या केवळ ५० ते ५५ टक्के रुग्णांशी संपर्क होत आहे. उर्वरित रुग्णांना संपर्क साधणे कर्मचाऱ्यांना शक्य होत असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पहिल्या लाटेपासून महापालिकेने संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीम (क्युआरटी) स्थापन केली. पण रुग्णसंख्या वाढण्यास सुरवात झाल्यानंतर रुग्णांना फोन करून त्यांच्या संपर्कातील नागरिकांची चाचणी करून घेण्याच्या सूचना देणारे फोन केले जाऊ लागले. सध्याही याच पद्धतीने काम केले जात आहे. पण दुसरी लाट ओसरल्यानंतर वॉर रुममधील महापालिकेचे शिक्षक, पीएमपीएलचे कर्मचारी हे त्यांच्या मुळ कामासाठी गेले. त्यामुळे सध्या या वॉररूममध्ये एक डॉक्टर आणि एक डेटाएंट्री आॅपरेटर हे दोघेच कार्यरत आहेत.

हेही वाचा: गृह विलगीकरण ठरतेय अडचणीचे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रोज नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या ८ हजारच्या पुढे गेली आहे. सक्रिय रुग्णसंख्या ४५ हजाराच्या पुढे आहे. औंध बालेवाडी, कोथरूड बावधन, हडपसर मुंढवा, नगर रस्ता या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक रुग्ण आहेत. तर भवानी पेठ, कसबा विश्रामबाग, बिबवेवाडी, वानवडी-रामटेकडी, येरवडा कळस या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रुग्ण कमी आहेत. पण या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत रोज १०० ते १ हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णांना एका दिवसात संपर्क होत नाही.

कमी रुग्णसंख्या असलेल्या क्षेत्रीय कार्यालयात ७० ते ८० टक्के रुग्णांशी संपर्क होत आहे. पण औंध, कोथरूड, हडपसर, नगर रस्ता या भागात संख्या जास्त असल्याने तेथे दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागत आहे. अनेकजण तर बरे झाल्यानंतर त्यांना फोन जात आहेत.

मानसिक आधार

महापालिकेची १५ क्षेत्रीय कार्यालये आहेत. या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रोज नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांना संपर्क करून त्यांना ताप आहे का? श्‍वास घेण्यास अडथळा होतोय का? आॅक्सिजन लेव्हल किती आहे? असे प्रश्‍न विचारले जातात. जर त्रास झाला तर त्वरित जवळच्या रुग्णालयातील डॉक्टरांना दाखवा असेही सांगितले जाते. गृहविलगीकरणातील रुग्णांना या फोनमुळे मोठा मानसिक आधारदेखील मिळत आहे.

डॉक्टरांकडून १८ हजार जणांची माहिती

खासगी डॉक्टरांकडे कोरोनाचे उपचार घेणाऱ्यांची माहिती महापालिकेला देण्यासाठी एक लिंक तयार केली आहे. या रुग्णांवर हेच डॉक्टर लक्ष ठेवून असतात. तिसरी लाट सुरू झाल्यापासून सुमारे १८ हजार रुग्णांची माहिती या डॉक्टरांकडून पालिकेला मिळाली आहे.

हेही वाचा: नोकरी देण्याच्या निमित्ताने ओळख झालेल्या महिलेवर बलात्कार

शहरातील रुग्णसंख्येची सद्यःस्थिती (२० जानेवारी पर्यंत)

  • ४६,८६३ - सक्रिय रुग्ण

  • ४५,१५२ - गृहविलगीकरणात

  • १,५३१ - शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे

गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांना फोन करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात वॉर रूम तयार केली आहे. तेथे एक डॉक्टर व डेटाएंट्री आॅपरेटर आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्वच रुग्णांशी संपर्क साधणे शक्य होत नाही. साधारणपणे ५५ टक्के कोरोनाबाधित नागरिकांशी संपर्क होत आहे. याची गती वाढविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात आणखी दोन कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार लवकरच नियुक्ती होईल.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख

Web Title: Omicron Coronavirus Lack Of Manpower Leads To Delay In Patient Contact

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top