
मराठमोळ्या ओमकारचा अमेरिकेत डंका; पटकावली तब्बल १३७ पदकं
पुणे : शालेय वयात स्काऊटची अधिकाधिक पदके मिळवणे, हे त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. अमेरिकन स्काऊटमध्ये पाच-दहा पदकांची कमाई देखील कौतुकास्पद कामगिरी मानली जाते. तर, २१ पदके मिळवल्यानंतर ‘ईगल स्काऊट’ही स्काऊटमधील सर्वोच्च श्रेणी प्राप्त होते. मात्र, जॉर्जियात राहणाऱ्या ओमकार ताम्हाणे या मराठमोळ्या अनिवासी भारतीय विद्यार्थ्याला २१ पदकांवर समाधानी होणे मान्य नव्हते. अमेरिकन स्काऊटमधील सर्वच्या सर्व म्हणजे तब्बल १३७ पदके जिंकण्याचा पराक्रम त्याने गाजवला आहे. अमेरिकन स्काऊटच्या इतिहासात ११ कोटींपैकी ५०० पेक्षाही कमी मुलांना जमलेली ही कामगिरी त्याने करून दाखवली आहे.
ओमकारचे आई-वडील मूळचे पुण्याचे. सुमारे वीस वर्षांपूर्वी ते अमेरिकेत स्थायिक झाले. अटलांटातील जॉर्जिया येथे ते सध्या वास्तव्यास आहेत. तिथेच जन्म झालेल्या ओमकारने तिसऱ्या इयत्तेत असताना स्काऊटमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली. काही वर्षांतच त्याने २१ पदके कमावत ‘ईगल स्काऊट’चा मान मिळवला. मात्र, पुढचे आव्हान त्याला खुणावत होते. प्रत्येक पदकाचा अडथळा पार करत त्याने पाच वर्षांतच १३७ पदकांची कमाई पूर्ण केली. हायकिंग, स्कूबा डायव्हिंग, स्केटिंग, आर्चरी अशा विविध वर्गवारीसाठी यातील प्रत्येक पदके त्याने पटकावली. २०२१ मध्ये बॅगपॅकिंगसाठीचे १३७ वे पदक पटकावत त्याने हा मैलाचा टप्पा गाठला. अमेरिकेतील माध्यमांनीही ओमकारच्या या कामगिरीची दखल घेतली आहे.
या प्रवासाने माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी मदत केली असल्याची भावना ओमकार व्यक्त करतो. ‘‘प्रत्येक पदक पटकावतानाचा अनुभव खूप काही शिकवणारा होता. प्रत्येक पदक मिळवताना मी नवीन गोष्टी शिकलो, नव्या लोकांना भेटलो. या अनुभवाने माझ्यासाठी करिअरच्या अनेक नव्या संधींची दारे खुली केली आहेत. या प्रवासातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे’’, असे ओमकारने सांगितले. सध्या ओमकार अकरावीत शिकत असून बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्याची त्याची इच्छा आहे. वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून समाजासाठी योगदान देण्याचा मानस तो व्यक्त करतो.
-महिमा ठोंबरे
Web Title: Omkar Got American Eagle Scout 137 Medals Mention American Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..