
अखेर पाचव्या दिवशी नमेश बाबर यांचे उपोषण मागे!
कात्रज : कात्रजसह नव्याने समाविष्ठ गावातील मूलभूत सुविधा व विकास कामांबाबत सुरू असलेले उपोषण आज मागण्या मान्य झाल्यावर मागे घेण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते नमेश बाबर यांनी कात्रज चौकात माझं कात्रज माझा अभिमान अंतर्गत रविवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. उपोषणाच्या पाचव्या दिवशी आयुक्त विक्रम कुमार व शिष्टमंडळात बैठक पार पडली. महापालिका प्रशासन पातळीवरील पाणी पुरवठा, मुस्लिम दफनभूमी रस्त्यासह अन्य मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे. त्यानंतर बाबर यांनी आमदार चेतन तुपे, आमदार संजय जगताप व मातोश्री प्रमिला बाबर यांच्या हस्ते उपोषण सोडले.
यावेळी तुपे म्हणाले, 'कात्रज चौकातील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या नियोजनात दुसऱ्या उड्डाणपूल बाबत पाठपुरावा, कात्रज-कोंढवा रोड रुंदीकरणासाठी जागा हस्तांतरण, तसेच तीनपट कर व गुंठेवारीतील जाचक अटीबाबत नगरविकास मंत्री यांच्यासोबत कायद्याच्या चौकटीत बसून दिलासा देण्यासाठी बाबर यांच्यासोबत पाठपुरावा करू. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शुक्रवारी नमेश बाबर यांच्यासोबत बैठक लावण्यात आली आहे'. तर, नव्याने समाविष्ठ गावात विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या आरक्षणबाबत आयुक्त दिवसे यांच्यासोबत बैठक घेऊन भूमिपुत्रांना दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, कात्रज चौकात करत असलेले आमरण उपोषणकर्ते नमेश बाबर यांची पाचव्या दिवशी प्रकृती ढासळली होती. सोडियम आणि क्लोराईड कमी झाल्याने अशक्तपणा खूप वाढला असल्याची माहिती डॉ. वैभव ताड यांनी दिली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन मागण्या मान्य केल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
महापालिका प्रशासन पातळीवरील पाणी, दफनभूमी रस्ता व अन्य मागण्या मान्य झाल्याचे लेखी पत्र मिळाले. तसेच, राज्यशासन व पीएमआरडीए यांच्याकडील मागण्यांबाबत खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार तुपे व जगताप यांनी ठोस आश्वासन दिले आहे. कात्रजच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेल्या उपोषणाला पक्षीय जोडे बाजूला ठेवत कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळाला.
- नमेश बाबर, आंदोलनकर्ते
मान्य झालेल्या मागण्या
कात्रज परिसराला सकाळी ६ ते ९:३० वेळेत पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन
कात्रज मुस्लिम दफनभूमीला २०५ अंतर्गत रस्ता देण्याचे मान्य.
नव्याने समाविष्ठ गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी-कोळेवाडी पीएमआरडीए विकास आराखड्यातील अन्यायकारक आरक्षणबाबत आयुक्त दिवसे सोबत बैठक
कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण जागा हस्तांतरण पाठपुरावा करण्याचे आश्वासन
कात्रज चौकातील वाहतूक कोंडीबाबत मेट्रोच्या डीपीआरमध्ये नियोजन
तीनपट कर, गुंठेवारी जाचक अटीबाबत नगरविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
Web Title: On The Fifth Day Namesh Babar Called Off The Fast Katraj Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..