महिलेवर वार करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

बांगड्यांची विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या डोक्‍यात काचेच्या तुकड्यांनी वार करून, जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस समर्थ पोलिसांनी अटक केली.

पुणे - बांगड्यांची विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या डोक्‍यात काचेच्या तुकड्यांनी वार करून, जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस समर्थ पोलिसांनी अटक केली.

आरोपी चार महिन्यांपासून फरारी होता. मोहसीन इजहार अन्सारी (वय २३, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. समर्थ पोलिसांनी यापूर्वी पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच, त्यांच्याविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील होप हॉस्पिटलजवळ ज्येष्ठ महिलेचा बांगड्या विक्रीचा स्टॉल आहे. १८ एप्रिलला आरोपी हा त्याच्या साथीदारांसह महिलेच्या स्टॉलवर गेला. त्याने त्याच्याजवळील काचेच्या तुकड्यांनी महिलेवर वार केले, त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले होते. समर्थ पोलिसांनी या प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली. मात्र, मोहसीन चार महिन्यांपासून फरारी होता. पोलिसांनी पकडू नये, यासाठी तो दुसरीकडे राहण्यासाठी गेला होता. दरम्यान, मोहसीन हा शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरामध्ये येणार असल्याची खबर पोलिस कर्मचारी नीलेश साबळे, सुमीत कुट्टे व सचिन पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आरोपीस सापळा रचून अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one arrested in pune