esakal | किरकटवाडीत विष प्राशन करून एकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

बोलून बातमी शोधा

किरकटवाडीत विष प्राशन करून एकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट
किरकटवाडीत विष प्राशन करून एकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट
sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: एका पन्नास वर्षीय व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना किरकटवाडी येथील बापुजीबुवा नगर परिसरात घडली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.आज दि.1 मे रोजी सदर व्यक्तीचा मृतदेह बापुजीबुवा नगर परिसरातील एका वापरात नसलेल्या जागेच्या कुंपणाच्या आतमध्ये आढळून आला. रामभाऊ जाणू ढेबे (वय 50, रा. बापुजीबुवा नगर, किरकटवाडी ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपासून रामभाऊ ढेबे हे बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दिनांक 30 एप्रिल रोजी हवेली पोलिस ठाण्यात रामभाऊ ढेबे हरवले असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार हवेली पोलिसांसह ढेबे यांचे कुटुंबिय व नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेतला जात होता.

हेही वाचा: 'सत्य बोललो तर शीर कापलं जाईल'; अदर पुनावालांना बड्या हस्तींकडून धमक्या

आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ढेबे यांची पत्नी परिसरात शोध घेत असताना एका ठिकाणी त्यांना त्यांच्या घरातील पाण्याची बॉटल आढळून आली. शंका आल्याने ढेबे यांच्या पत्नीने पुढे बंदिस्त कुंपणाच्या आत जाऊन पाहिले असता त्यांना ढेबे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ हवेली पोलिस ठाण्याला याबाबत कळवले. सदर घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक राहुल आवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धनवे, संतोष भापकर, महेंद्र चौधरी व होमगार्ड अमित गोगावले घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून दाखल अंमलदार पोलीस हवालदार रामदास बाबर आणि पोलीस कॉन्स्टेबल संदीप बरकाले याबाबत अधिक तपास करत आहेत.