कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक ज्येष्ठांना अन्य आजार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

एक लाखाहून अधिक व्यक्तींना मूत्रपिंड, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अस्थमा यांसारखे आजार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. गंभीर बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना हे आजार आहेत.

पुणे - शहरात एकीकडे कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक व्यक्तींना मूत्रपिंड, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अस्थमा यांसारखे आजार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. गंभीर बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना हे आजार आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि झालाच, तर त्यांच्यावर वेळेत योग्य उपचार व्हावेत, यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. परिणामी, कोरोनाचा मृत्यूदर कमी होण्याची आशा आहे. 

कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, सध्या रोज सरासरी 35 ते 40 जणांचा मृत्यू होत आहे. मृतांपैकी बहुतांशी रुग्णांना कोरोनासह अन्य आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावर उपाय म्हणून कोरोनाची संख्या अधिक असलेल्या भागांतील प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्यातून व्यक्तींची "मेडिकल हिस्टरी' जाणून घेत; त्या-त्या आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत काही जणांची कोरोनाची चाचणी केली जात आहे. ज्यामुळे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे शक्‍य होत आहे, असे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

पन्नास वर्षांवरील व्यक्तींची तपासणी 
घरांमधील साधारणपणे 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांना कोणाला गंभीर आजार आहेत, ती व्यक्ती नेमके कोणते उपचार घेत आहे, औषधे वेळेत घेते का, याचसोबत या रुग्णांना दोनपेक्षा अधिक दिवसांपेक्षा ताप, खोकला, सर्दी आहे का, हेही तपासले जात आहे. गरजेनुसार लोकांना महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार व्यवस्था केली आहे. 

तपासणीसाठी पथके -  609 (एका पथकात दोन व्यक्ती) 
तपासणी झालेली घरे  -  3 लाख 19 हजार 833 
अन्य आजार असलेली रुग्ण  - 1 लाख 4 720 

इतर आजार असलेल्या; परंतु कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास ते बरे होतात. त्यासाठी बाधित क्षेत्रांतील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांना अन्य आजार आहेत, त्यांच्या घरी रोज जाऊन उपचाराकडे लक्ष देण्यात येत आहे. 
-डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one lakh people have been diagnosed with diseases like kidney, heart disease