esakal | अधिकाऱ्यांना एकेरी नि नेत्यांची टर

बोलून बातमी शोधा

Leader

असे वापरलेत शब्द : ‘तो’. ‘त्याच्या हाताखाली’. ‘तो दगड आहे’. ‘त्याला काही येत नाही’. ‘तो फोन उचलत नाही’. ‘त्याला त्या विभागातून बदला’. 
राज्य, राष्ट्रीय नेत्यांची टर : एखाद्या विषयावर बोलताना शहराचा मुद्दा सोडून थेट राज्य किंवा राष्ट्रीय नेत्यांवर बोलायचे. त्यांच्या नावांचा उल्लेख करून टर उडवली जाते. 
गोंधळात सभा उरकणे : एकाने अपशब्द मुद्दाम वापरायचा किंवा आक्षेपार्ह कृती करायची. इतरांनी आक्षेप घेऊन गोंधळ घालायचा. त्यामुळे गोंधळातच सभा उरकली जाते.

अधिकाऱ्यांना एकेरी नि नेत्यांची टर
sakal_logo
By
पीतांबर लोहार

पिंपरी - शिक्षण, समज, उमज आणि प्रसिद्धीची प्रचंड हाव, यामुळे महापालिका सभागृहात सभाशास्त्राचे धिंडवडे निघत आहेत. अनेकदा अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख केला जातो. ‘अरे-कारे’ची भाषा व अपशब्दांचा वापर केला जातो. इतकेच नव्हे, तर एकमेकांच्या राजकीय पक्षाच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचीसुद्धा टर उडविली जाते. यामुळे शहराची प्रतिमा मलीन होत असून, लोकप्रतिनिधींना सभाशास्त्राचे धडे देण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

प्रशासनावर अंकुश राहावा, शहरविकासाबाबत सर्वसंमतीने निर्णय व्हावेत, खर्चांना मंजुरी मिळावी, अशा विधायक कामांसाठी महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, हे सर्वसंकेत पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र आहे. मात्र, अधिकारी ऐकत नसतील, कामचुकारपणा करत असतील, दफ्तरदिरंगाई करत असतील; तर वरिष्ठांकडे तक्रार करणे गरजेचे असते. मात्र, याऐवजी सभागृहामध्ये ‘अरे-कारे’ची भाषा वापरून त्याचा एकेरी उल्लेख करणे शोभनीय नाही. कारण, अशा वक्तव्याची सभागृहाबाहेर समाजात चर्चा होते, त्या वेळी सर्वांचीच नाचक्की होते, याचे भान सर्वांनी ठेवण्याची गरज आहे.

सुवर्ण महोत्सव तरी...
मार्च १९७० मध्ये शहर अस्तित्वात आले. आता सुवर्ण महोत्सव साजरे करीत आहे. तरीसुद्धा लोकप्रतिनिधींकडून अपशब्दांचा वापर म्हणजे शहराचा अवमानच आहे. काही जण ‘इन्स्टंट’ प्रसिद्धीसाठी सभागृहात बोलत असल्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करून प्रभागात व्हायरल करतात. काही जण मीडिया कक्षाकडे बघत लक्ष वेधत कृती करतात. पुनःपुन्हा बोलू देण्याचा आग्रह धरतात. याबाबत, उत्साहाच्या भरात काहींकडून अपशब्दांचा वापर होत असल्याचे मत ज्येष्ठ नगरसेवकांनी व्यक्त केले.

प्रशिक्षणाची गरज का...
अनेकांना सभाशास्त्र, सभागृहाचे कामकाज, आस्थापनेचे कामकाज, निर्णय प्रक्रियेबाबत माहिती नसते. ती व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण दिले जाते. फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना ‘यशदा’मध्ये प्रशिक्षण दिले होते. यात काही नवीन आहेत, तर काही दोनपेक्षा अधिक वेळा निवडून येऊन प्रतिनिधित्व करीत आहेत. तरीसुद्धा सभाशास्त्राचे संकेत पायदळी तुडविले जाणे शहरासाठी शोकांतिका आहे. 

येथे आहे प्रशिक्षण
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे सिमला (हिमाचल प्रदेश) येथे आठ ते नऊ एप्रिल रोजी नागरी सुविधा वितरण व लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी, सभाशास्त्र आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी १४ हजार ७५० रुपये प्रशिक्षण शुल्क आहे.

काय आहे सभाशास्त्र...
सभेच्या पद्धतशीर नियोजनासाठीची शास्त्रशुद्ध नियमावली म्हणजे सभाशास्त्र अर्थात लॉज्‌ ऑफ मीटिंग्ज. त्यानुसार सभेची पूर्वसूचना विशिष्ट कालमर्यादेत सभेपूर्वी सभासदांना देण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. कार्यक्रमपत्रिकेनुसार विषयांवर चर्चा व निर्णय होऊन ठराव संमत होणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकदा असे होताना दिसत नाही.