नसरापूर उड्डाण पुलावरून एका बाजूने वाहतूक सुरू

किरण भदे ः सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर-चेलाडी (ता. भोर) येथील उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, त्यावरून सोमवारपासून (ता. 20) साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामुळे महामार्गावर चेलाडी येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

कोंडी सोडविण्यासाठी पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना परवानगी

नसरापूर (पुणे) : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर-चेलाडी (ता. भोर) येथील उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, त्यावरून सोमवारपासून (ता. 20) साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामुळे महामार्गावर चेलाडी येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

 

नसरापूर-चेलाडी येथील गेले अनेक महिने प्रलंबित राहिलेला व अनेकदा काम सुरू होऊन वारंवार बंद पडलेल्या पुलाच्या एका बाजूचे काम अखेर पूर्ण झाले. महामार्गावरील हा सर्वांत मोठा उड्डाण पूल असून, पुलाची डावी बाजू म्हणजे पुणे ते सातारा ही लेन पूर्ण करण्यात आली आहे. उजव्या बाजूचे सातारा ते पुणे कामही प्रगतिपथावर आहे. वास्तविक हा पूल जून-जुलैमध्ये पूर्ण होणार होता. मात्र, उपठेकेदाराने पैशाअभावी काम मध्येच थांबवले. त्यानंतर सतत पडणारा पाऊस यामुळे काम पुन्हा रेंगाळले.

 

दिवाळीनंतर महामार्गाच्या सर्वच कामांवर आक्षेप घेत टोल नाका हटाव कृती समिती स्थापन झाली. कामे पूर्ण नाहीत, तर टोल नाही अशी घोषणा देऊन थेट टोल नाका हलविण्याची मागणी केली. त्याची महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांना गांभीर्याने दखल घ्यावी लागली. जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सर्वच कामांच्या पूर्ततेची तारीख जाहीर करावी लागली. त्यानुसार नसरापूर पुलाच्या एका बाजूचे काम 20 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते, ते पूर्ण करण्यात आले. या रस्त्यावरून सोमवारपासून (ता. 20) वाहने सोडण्यात आली. ती डावी बाजू असली, तरी तूर्त उजव्या बाजूची म्हणजे पुण्याकडे जाणारी वाहने या रस्त्यावरून सोडण्यात आली आहेत.

"दुसरी बाजूही 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार'
रिलायन्स इन्फ्राचे या कामाचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी सांगितले, की आम्ही व महामार्ग प्राधिकरण यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या मुदतीत नसरापूर उड्डाण पुलाची एक बाजू वाहतुकीस खुली करण्यात आली आहे. महामार्गावर साताऱ्याकडून जाणारी वाहतूक वेगवेगळ्या वेळेत असली, तरी येणारी वाहतूक ठरावीक वेळेतच असते, त्यामुळे येणाऱ्या वाहनांची कोंडी होते. नसरापूर येथे वेल्ह्यातून येणारी वाहने व रविवारचा बाजार यांमुळे सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. ती वाहतूक या पुलावरून वळविल्याने येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूचे कामही वेगात सुरू असून, 15 फेब्रुवारी या मुदतीत ती बाजूही वाहतुकीस खुली करण्यात येईल.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One-way traffic starts from Nasarapur flyover