ससून रुग्णालयात अत्याचार पीडितांसाठी एक खिडकी योजना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

लैंगिक अत्याचाराने पीडितांना आता ससून रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागात फिरावे लागणार नाही. त्यांना एकाच ठिकाणी सर्व उपचार आणि कायदेशीर सल्ला मिळण्याची सुविधा रुग्णालयात मिळावी यासाठी ‘एक खिडकी योजना’ ससून रुग्णालयात सुरू करण्यात आली.

पुणे - लैंगिक अत्याचाराने पीडितांना आता ससून रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागात फिरावे लागणार नाही. त्यांना एकाच ठिकाणी सर्व उपचार आणि कायदेशीर सल्ला मिळण्याची सुविधा रुग्णालयात मिळावी यासाठी ‘एक खिडकी योजना’ ससून रुग्णालयात सुरू करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ससून रुग्णालयात लैंगिक अत्याचार पीडितांना मदत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘एक खिडकी योजना’चे उद्‌घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयेच अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. 

डॉ. चंदनवाले म्हणाले, ‘‘बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार व ॲसिड हल्ला यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांना वैद्यकीय सल्ला, समुपदेशन, अर्थसाह्य व कायदेशीर सल्ला आणि पुनर्वसन करण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. रुग्णालयात एका छत्राखाली स्त्रीरोगशास्त्र, बालरोगशास्त्र, बालरोगशल्य चिकित्साशास्त्र, मनोविकारशास्त्र, प्लॅस्टिक सर्जरी व न्यायवैद्यकशास्त्र या विभागातील तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला दिला जाणार आहे. तसेच पुणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरणतर्फे मोफत कायदेशीर सल्ला दिला मिळेल. यासाठी ॲड. लक्ष्मी वाघमारे, ॲड. उज्ज्वला थोरात आणि ॲड. श्रुती डुंबरे या विधिज्ञांची नेमणूक केली आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचार पीडित व्यक्ती साह्य घेण्यासाठी पुढे येतील व त्यांना न्याय मिळणे सुलभ होईल. यामुळे पीडित व्यक्तीच्या पुनर्वसनात मोलाचा हातभार लागेल.’’  

या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. रमेश भोसले, डॉ. वंदना दुबे, डॉ. आरती किणीकर, डॉ. नितीन अभिवंत, डॉ. विजय जाधव, डॉ. मीनाक्षी भोसले व डॉ. सोमनाथ सलगर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one window plan for victims of abuse in sasoon hospital