कोरोनाचे पुण्यात एक वर्ष पूर्ण : ‘न्यू नॉर्मल’कडे धैर्याने वाटचाल

9th-march
9th-march
Updated on

राज्यातील कोरोनाचे पहिले दोन रुग्ण ९ मार्चला पुण्यात आढळले. संचारबंदीपासून ते लॉकडाउनपर्यंत आणि अनलॉकपासून ते न्यू नॉर्मलपर्यंतचा प्रवास आपण वर्षभरात केला. सप्टेंबरपर्यंत वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतातूर झालेले वातावरण, एकेका बेडसाठी रुग्णालयांच्या दाराशी लागलेल्या रांगा, ऑक्सिजन मिळविण्यासाठीची दमछाक यातून आता आपण सावरत आहोत. जानेवारीपर्यंत कमी झालेली रुग्णसंख्या आता वाढत असली तरीही त्यावर नियंत्रणाचे प्रभावी मार्ग आपल्याला गवसले आहेत.

विषाणूंमधील संभाव्य बदल
प्रत्येक विषाणू स्वतःमध्ये सातत्याने बदल करत असतो. साथीच्या या महाभयंकर उद्रेकानंतर विषाणूंमधील बदलांवर सातत्याने लक्ष ठेवावे लागत आहे. त्यासाठी प्रयोगशाळा, उपकरणे आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची कस लागणार, हे निश्चित! त्यातून विषाणूंमधील बदल आणि त्यांचा जनुकीय अभ्यास करता येईल.

बदलाचा परिणाम
जनुकीय रचना बदलल्यामुळे विषाणूला नवे गुणधर्म मिळतात. काही वेळा या बदलांमुळे संसर्ग वाढतो किंवा त्याच्या संसर्गाचा वेग मंदावतो देखील. सध्या इंग्लंडमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन विषाणूंमुळे संसर्गाचा वेग वाढला. त्यातही तरुणांना याचा सर्वाधिक संसर्ग झाला. परंतु, नव्या विषाणूच्या संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे दिसले नाहीत.

जनुकीय अभ्यास
या भूतलावर जेवढे काही सजीव आहेत, त्या सगळ्यांमध्ये ‘डीएनए’ (डीऑक्सिरीबोन्युक्लिक ॲसिड) आणि ‘आरएनए’ (रिबोन्युक्लिक ॲसिड) याची वैशिष्ट्ये समान असतात. ‘डीएनए’ची ही रचना सर्व प्राण्यांमध्ये दिसते. मात्र, विषाणूंमध्ये ‘आरएनए’ असतो. ‘डीएनए’मध्ये ज्याप्रमाणे त्या सजीवाची सगळी माहिती संकलित केलेली असते. तशी, विषाणूंची सगळी माहिती ‘आरएनए’मध्ये साठवलेली असते. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूंच्या जनुकीय रचनेत बदल दिसतो. तोच स्ट्रेन भारतात दिसतो का, याचा अभ्यास राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) सातत्याने करत आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयानेही ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ केले आहे. हा अभ्यास पुढील काही वर्षे निरंतर करावा लागेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मानवी वर्तणूक
जगभरात माणसाच्या दैनंदिन जीवनात बदल घडवायला कोरोना उद्रेकाने प्रवृत्त केले. १२-१८ तास घराबाहेर राहून काम करणाऱ्यांना ६८ दिवस लॉकडाउनमध्ये घरात बसावं लागलं. यातून माणसांच्या वर्तणुकीत दोन प्रमुख बदल घडलेः
१. बॅक टू बेसिक्स 
माणूस परत एकदा आपल्या जुन्या सवयींकडे वळला. बाहेरून घरात आल्यानंतर थेट अंघोळ करणे. वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुणे. ते निर्जंतूक करणे. हस्तांदोलन करण्यापेक्षा हात जोडून नमस्कार करणे. घरभर चप्पल घालून न फिरणे अशा एक नाही तर असंख्य सवयी बदलल्या. त्यामुळे ‘बॅक टू बेसिक्स’कडे निघालो आहोत.

२. ‘एसएमएस’चे न्यू नॉर्मल
सॅनिटाझर (एस), मास्क (एम) आणि सोशल डिस्टन्सिंग (एस) हा ‘एसएमएस’ कोरोनाकाळातील परवलीचा शब्द ठरला आहे. त्या शिवाय कोरोनाच्या संसर्गापासून आपले संरक्षण होणार नाही आणि पर्यायाने उद्रेकाची तीव्रता रोखता येणार नाही, याची खात्री पटलेली आहे.  

पुणे जिल्ह्यातील लसीकरण

  • आरोग्य सेवक - १,०१,१४०
  • फ्रंटलाइन वर्कर - ४६,२७४
  • ज्येष्ठ नागरिक - ३०,०५३
  • सहव्याधी - ३,३४५

नियमित आजाराच्या दिशेने
स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण अकरा वर्षांनंतर आजही आपल्याला आढळतात. कारण, तो आता आपल्यासाठी इतर फ्ल्यूसारखाच एक आजार झाला आहे. कोरोनादेखील पुढील काही वर्षांमध्ये देशातीलच नाही तर जगभरातील नियमित आजारामध्ये रुपांतर होईल. त्याच्या निदानासाठी सातत्याने चाचण्या कराव्या लागतील.  

विज्ञानाची कास
नवीन लशी आणि लसीकरण त्याच बरोबर कोरोनावर रामबाण औषध ही भविष्यातील कोरोना नियंत्रणाची त्रिसूत्री राहील. सध्या आरोग्य सेवक, फ्रंटलाइन यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षे वयाच्या सहव्याधी असलेल्यांना लस दिली जात आहे. यापुढे लहान मुलांसाठीही लस येईल.

जीव असो की जीवास्त्र
कोरोना हा जीव असो जीवास्त्र याच्याशी जगभर युद्ध सुरू आहे. भविष्यातही अशा प्रकारचे सूक्ष्मजीवांचा उद्रेक किंवा जीवास्त्रांचा हल्ला होणारच नाही, अशी कोणतीही खात्री नाही. भविष्यातील साथ वेळीच नियंत्रित करण्यात कच्चे दुवे कोणते राहिले आहेत, हे या कोरोना उद्रेकात स्पष्ट झाले. आपल्याकडे घशातील स्वॅब घेण्याची सुविधा नव्हती. घेतलेला स्वॅब प्रयोगशाळेपर्यंत कसा घेऊन जायचा, हा प्रश्न होता. मोजक्याच प्रयोगशाळा अद्ययावत आणि प्रमाणित होत्या. त्यातही सुरुवातीला कोरोनासाठी आवश्यक साधनांचा अभाव होता. पीपीई किट नव्हते. एन९५ मास्क नव्हता. उपचारांसाठी ऑक्सिजन बेड नव्हते. साथ उद्रेकात कोणती तयारी अत्यावश्यक असते, हा मोठा धडा कोरोनाच्या काळात मिळाला. त्यासाठी भारत आत्मनिर्भर होत आहे. स्वॅब घेण्यापासून ते प्रतिबंधक लशीपर्यंत सगळे ‘मेक इन इंडिया’मधून होत आहे. ही खऱ्या अर्थाने भविष्यातील कोणत्याही साथरोगाची तयारी आहे.

स्वाइन फ्ल्यूचा २००९ मध्ये पहिला उद्रेक झाला. तेव्हापासून आजपर्यंत तो वेळोवेळी त्याचे अस्तित्व दाखवत आहे. सध्या कोरोना विषाणूंच्या संसर्ग मर्यादित ठेवण्यासाठी किंवा त्याच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मास्क, वारंवार हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
- वर्षा पोतदार, शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विषाणू संस्था

स्पॅनिश फ्ल्यूसारखा संसर्गजन्य आजाराचा उद्रेक चार-पाच वर्षे होता. कोरोनाच्या उद्रेकाचाही दुसरा टप्पा सुरू होत आहे. परंतु, यावेळी आपल्याकडे त्याला प्रतिबंध करणारी लस आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढिल्यास डिसेंबर २०२१ पर्यंत त्याची तीव्रता कमी होईल.
- डॉ. सुभाष साळुंके, निवृत्त महासंचालक, सार्वजनिक आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य

लोकसंख्येची घनता, हवामान आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन या सगळ्या घटकांमुळे कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पुण्यात आढळला. प्रभावी सर्व्हेक्षण, लसीकरण यांच्या आधारे आपल्याला या वाढीवर नियंत्रण आणता येईल.
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com