स्पर्धा परीक्षेची तयारी ‘ऑनलाईन’

मीनाक्षी गुरव
रविवार, 5 एप्रिल 2020

‘व्हर्च्युअल क्‍लासरूम’ची वैशिष्ट्ये -

  • वेळेची बचत
  • प्रश्‍न विचारणे, शंकांचे निरसन करणे शक्‍य
  • मार्गदर्शकांशी थेट संवाद
  • प्रत्यक्ष भरणाऱ्या वर्गाचा ‘लाईव्ह अनुभव’

‘व्हर्च्युअल क्‍लास’साठी होतोय याचा वापर -

  • ‘झुम क्‍लाऊड मिटिंग ॲप’आणि स्वतंत्र सॉफ्टवेअरद्वारे लाईव्ह लेक्‍चर
  • टेलिग्रामद्वारे नोट्‌सची पीडीएफ फाईल आणि ध्वनीफित उपलब्ध
  • व्हॉटस्‌ॲप आणि अन्य चॅटिंग ॲपद्वारे होतेय विविध विषयांवर चर्चा

‘व्हर्च्युअल क्‍लास’मुळे लॉकडाऊनमध्येही होतोय नियमित अभ्यास 
पुणे - कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ असला तरीही; स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे असंख्य विद्यार्थी हा काळ ‘क्वॉलिटी टाईम’ म्हणून वापरत आहेत. होय, घरी ऑनलाईन शिकवणी वर्गाद्वारे त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत आहे. त्याशिवाय वेळ वाचत असल्याने सरावाला अधिक वेळ मिळत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थात प्रत्यक्ष वर्गातील शिकवणीचा अनुभव हा वेगळाच असला, तरीही अभ्यास खोळंबून राहण्यापेक्षा ‘व्हर्च्युअल क्‍लास’चा पर्याय अधिक सोयीस्कर असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी सांगत आहेत.
मूळची सांगलीची असलेली क्षितिजा खोत हिने मॅकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात आली. अर्थात लॉकडाऊनमुळे सध्या ती तिच्या मूळगावी गेली असून तिथूनच ‘लाईव्ह लेक्‍चर’मध्ये सहभागी होत आहे. ती म्हणते,‘‘प्रत्यक्ष वर्गात बसून शिकणे हा अनुभव वेगळाच असतो. त्यामुळे ऑनलाईन शिकताना सुरवातीला थोडेसे अवघड गेले. परंतु आता नियमितपणे शिकता येत आहे. ‘व्हर्च्युअल क्‍लास’मुळे खासगी शिकवणीला ये-जा करण्यासह अन्य वेळ वाचत आहे. हा वेळ अभ्यासासाठी ‘क्वॉलिटी टाईम’ म्हणून वापरता येत आहे.’’

मुंबईकर असणारी शर्वरी कुलकर्णी इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग पूर्ण करून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी  पुण्यात आली. कोरोनामुळे ती पुन्हा मुंबईला परतली असली, तरीही तिचा अभ्यास ऑनलाइनद्वारे सुरू आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे आमचे वेळापत्रक कोलमडले. परंतु आता ऑनलाईन शिकवणी वर्ग, प्रश्‍नोत्तरांचा तास, नोट्‌सची देवाणघेवाण यामुळे नियमित अभ्यास सुरू आहे. आम्ही ‘झूम ॲप’ वापरून शिकवणीला हजेरी लावत आहोत. यात हात वर करून प्रश्‍नही विचारता आणि चर्चा करता येते, असे तिने सांगितले.

सोलापूरचा सिद्धराम कोटनूर सध्या पुण्यात आहे. तो बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाला आहे. टेलिग्रामद्वारे अभ्यासक्रमासंदर्भातील शैक्षणिक साहित्य पीडीएफ आणि ध्वनीफितीद्वारे उपलब्ध असल्याने सराव करणे शक्‍य होते. वर्गानुसार 
‘लाईव्ह शिकवणी’ होत असल्याचा फायदा होतो, असे सिद्धराम याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Competition Exam Preparation