"ऑनलाइन कॅम्पस' ठरतोय अभ्यासाचा दुवा 

online-education
online-education

पुणे - वर्षभरात कधीतरी वेगळा प्रयोग म्हणून यापूर्वी वापरण्यात येणारी ऑनलाइन शिक्षण प्रणालीच आता मुख्य प्रणाली बनू पाहात आहे. सुरूवातीला वापरायला किचकट वाटणारे हे तंत्रज्ञान आता कोरोनामुळे दूर गेलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील दुवा ठरत आहे, अशा शब्दात शिक्षक आपले अनुभव सांगत आहेत. परंतु शहर असो वा ग्रामीण भागात इंटरनेट यंत्रणेत सातत्याने येणाऱ्या अडचणी आणि विविध ऍपमध्ये असणारा सुरक्षिततेचा अभाव यामुळे "स्टडी फ्रॉम होम'मध्ये व्हॉट्‌सऍपचा वापर अधिक करत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. 

शहरी व ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचा अभ्यासक्रम संपत आला असतानाच लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा, हे आव्हान कनिष्ठ महाविद्यालयांसमोर होते. परंतु फारसे टेक्‍नोसॅव्ही नसलेल्या शिक्षकांनी देखील अवघ्या काही दिवसात तंत्रज्ञान अवगत केले. त्यानंतर महाविद्यालयांतर्फे विद्यार्थी व शिक्षकांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले. अकरावीचा अभ्यासक्रम संपवून आता ही महाविद्यालये बारावीच्या तयारीला लागली आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बहुतांश मुलींकडे ऍपची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही व्हॉट्‌सऍपचा प्रभावी वापर करत आहोत. त्याद्वारे शिक्षक पीडीएफ, छोटे व्हिडिओ आणि ऑडिओ व्हॉट्‌स ऍपवर पाठवत आहेत. परंतु ऑनलाइन शिक्षण अधिक चांगले होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. 
- पुजा जोग, प्राचार्य, रेणुका स्वरूप प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय 

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय सगळ्यात आधी बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे उर्वरित अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, असा प्रश्न होता. परंतु उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले आहे. अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून आता आम्ही बारावीची तयारी देखील सुरू केली आहे. 
- संजीवनी ओमासे, उपप्राचार्य, नूतन मराठी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय 

लॉकडाउनमुळे अपूर्ण राहिलेला अकरावीचा अभ्यासक्रम आता पूर्ण केला असून बारावीची तयारी सध्या सूरू आहे. परंतु विज्ञान शाखेची प्रात्यक्षिके ऑनलाइनद्वारे शक्‍य होत नाही. ऑनलाइन वर्गात जवळपास 60ते 70 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. 
- रोहिदास भारमळ, प्राचार्य, भावे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय 

महाविद्यालयाला सुट्टी दिल्यानंतर आता अभ्यासाचे पुढे काय होणार असा प्रश्न पडला होता. परंतु झूमसारख्या ऍपचा वापर करून पुन्हा अभ्यासाला सुरवात झाली आहे. वर्गापेक्षा या ऑनलाईन वर्गात शिक्षकांचे अधिक वैयक्तिक लक्ष असल्याचे जाणवते. या वर्गात प्रश्न विचारणे, शंकांचे निरसन करणे याचे प्रमाण वाढले आहे. 
- आकांक्षा पवार, विद्यार्थिनी 

ऑनलाइन शिक्षणातील प्राधान्यक्रम : 
- झूम, वेबेनॉर असे व्हीडीओ कॉन्फरन्सेस ऍप 
- व्हाट्‌सएप, ई-मेलद्वारे पीडीएफ, ऑडियो, व्हिडिओ, पीपीटी, वर्क शीट पाठविणे 
- यु ट्यूब चॅनल 

ऑनलाइन शिक्षणातील अडचणी : 
- इंटरनेटची सुविधा सुरळीत नसणे 
- ऍप वापरताना माहितीच्या सुरक्षिततेबाबत शंका 
- तंत्रज्ञानाच्या माहितीचा अभाव 
- तंत्रज्ञानाच्या वापरासाठी पुरेशी सोय उपलब्ध नसणे 
- अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिके पूर्ण करणे अशक्‍य 

या कौशल्यांची आहे गरज 
- ऑनलाइन शैक्षणिक साहित्याची निर्मिती 
- व्हिडिओ, ऑडिओ, पीपीटी बनविणे 
- शैक्षणिक तंत्रज्ञान वापरणे 
- शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना प्रशिक्षण देणे 
- आपल्या सोयीनुसार ऍप विकसित करणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com