esakal | स्वस्तात टिव्ही खरेदीचा मोह पडला तब्बल सहा लाखांना बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News Fraud

स्वस्तात टिव्ही खरेदीचा मोह पडला तब्बल सहा लाखांना !

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे @spandurangSakal

पुणे : तब्बल 32 इंची टिव्ही, दोन वर्षांची वॉरंटी आणि तिही अवघ्या साडे सात हजार रुपयांना, अशी भारी 'ऑफर' कोण स्विकारणार नाही. एका विक्रेत्याला ऑनलाईन माध्यमाद्वारे काही जणांनी टिव्ही खरेदीसाठी ही धमाकेदार जाहिरात असल्याचे सांगितले. त्यानेही एक, दोन नव्हे तर तब्बल 140 टिव्ही खरेदीसाठी ऑनलाईन माध्यमाद्वारे सहा लाख रुपये भरले. त्यानंतर टिव्ही पोचविण्याची मुदत संपूनही टिव्ही काही पोचले नाहीत. त्यामुळे विक्रेत्याने त्यांच्याशी वारंवार संपर्क केला, तेव्हा त्यास सायबर गुन्हेगारांनी आपल्याला सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचे समजले. अखेर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी रोहन कांबळे (वय 30, रा. बिबवेवाडी) यांनी याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 25 ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये घडली आहे.

पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''फिर्यादी रोहन कांबळे हे टिव्ही विक्रेते आहेत. फिर्यादीला काही दिवसांपुर्वी एका ग्राहकाकडून टिव्हीची मोठी ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे त्यास मोठ्या प्रमाणात टिव्ही संच पाहिजे होते. त्यासाठी त्याने सोशल मीडियावर त्यासंबंधी जाहिरात दिली होती. त्यानुसार, 25 जानेवारी 2021 या दिवशी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या व्हॉटस्‌अपवर उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका कंपनीचे लेटरहेड पाठविले. त्यावर साडे सात हजार रुपयांना 32 इंच टिव्ही, त्यासाठी खास दोन वर्षांची वॉरंटी असा मजकूर होता.

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​

फिर्यादीलाही कमी वेळेत व कमी किंमतीत टिव्ही पाहीजे असल्याने त्यांनी लेटरहेडवरील क्रमांकावर संपर्क साधला. त्यानुसार, त्यांच्यात 140 टिव्ही संचासाठी सहा लाख रुपये देण्याचा व्यवहार ठरला. संबंधीत व्यक्तींनी पाठविलेल्या बॅंक खात्यावर फिर्यादीने ऑनलाईन माध्यमाद्वारे सहा लाख रुपयांची रक्कम भरली. टिव्ही पाठविण्यासाठीची मुदत संपूनही फिर्यादीला टिव्ही संच मिळाले नाहीत. त्यानंतर फिर्यादीने संबंधीत व्यक्तींशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा संपर्क झाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर करीत आहेत.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

loading image