प्रवासी घेण्यासाठी हप्त्याची मागणी; मोटार चालकाला मारहाण

प्रवासी घेण्यासाठी हप्त्याची मागणी; 
मोटार चालकाला मारहाण
Published on: 

पिंपरी : प्रवासी घेण्यासाठी हप्त्याची मागणी करीत एका मोटार चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना वाकडमधील भुजबळ चौक येथे घडली. या प्रकरणी शिवराज म्हाळाप्पा हेगडे (रा. सद्‌गुरुनगर, भोसरी, मूळ- सातारा) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम विशाल दुधभाते (रा. भुजबळ चौक, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांची मोटार घेऊन थांबले असताना आरोपीने त्यांना मारहाण केली आणि वाकड ब्रीज येथून पॅसेंजर न्यायचे असल्यास दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल आणि पोलिसात तक्रार केल्यास ठार मारून टाकीन, असे धमकावले. आरोपीने यापूर्वीही शिवराज यांना धमकी देऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने रोख व ऑनलाइन स्वरूपात दहा ते बारा हजार रुपये घेतले आहेत.

महिलेची सव्वा सात लाखांची फसवणूक
पिंपरी : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगून एका महिलेकडून सात लाख २४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना चिखली येथे घडली. या प्रकरणी ४० वर्षीय महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.

गुंतवणुकीवर जास्त नफ्याचे आमिष; २४ लाखांची फसवणूक
पिंपरी : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त नफा कमविण्याचे आमिष दाखवून एकाची २४ लाखांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार प्राधिकरण, निगडी येथे घडला. या प्रकरणी मनोज अरविंद चव्हाण (रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या व्हॉट्सॲपवर शेअर मार्केट अनुषंगाने एक लिंक पाठवून एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास मोठा आर्थिक नफा कमविण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर ऑनलाइन स्वरूपात वेगवेगळ्या खात्यांवर रक्कम घेतली. मात्र, नंतर गुंतवणूक केलेली रक्कम किंवा त्याचा काहीही परतावा फिर्यादीस परत न देता त्यांची २४ लाख ९० हजारांची फसवणूक केली.

वादाचा राग मनात धरून दोघांना मारहाण
पिंपरी : वादाचा राग मनात धरून दोघांना बांबू, लोखंडी फायटरने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना वल्लभनगर बस स्थानकासमोर घडली. या प्रकरणी नितीन सतिराम यादव (रा. आदर्श नगर, मोशी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल अंभोरे (रा. भोसरी) आणि त्याच्या इतर तीन अज्ञात साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र गोपाल चौधरी हे वाहन चालविण्याच्या परवाना संदर्भात कासारवाडी येथील कार्यालयात गेले असता तेथे दोन आरोपींशी वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा पाठलाग करून बस स्थानकासमोर अडवले. त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेत चौघांनी मिळून फिर्यादी व त्यांचा मित्र गोपाल यांना मारहाण करून जखमी केले.

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी : जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही शहरात आलेल्या तडीपार गुंडाला निगडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला. ही कारवाई निगडी येथे करण्यात आली. इम्तियाज ऊर्फ चिंट्या मुश्ताख शेख (रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी इम्तियाज याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तरीही तो शहरात आला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com