ऑनलाइन फसवणूक आता टळणार!

संकेतस्थळ बनावट आहे किंवा सुरक्षित आहे, याबाबत तुम्हाला अवघ्या काही मिनिटांतच माहिती मिळेल तीही ‘व्हॉट्‍सॲप चॅट बॉट’वर.
Online Cheating
Online CheatingSakal

पुणे - तुम्हाला ऑनलाइन खरेदी करायची आहे; पण ते संकेतस्थळ तुम्हाला संशयास्पद वाटत आहे? तर काळजी करू नका, ते संकेतस्थळ बनावट आहे किंवा सुरक्षित आहे, याबाबत तुम्हाला अवघ्या काही मिनिटांतच माहिती मिळेल तीही ‘व्हॉट्‍सॲप चॅट बॉट’वर. इंटरनेटवरील आर्थिक गैरव्यवहार व नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी ‘सेफकॉम सेफ्टी फाउंडेशन’ या संस्थेने खास बॉटची निर्मिती केली आहे. नागरिकांना आता त्याचा फायदा होऊ लागला आहे.

कुठल्याही संकेतस्थळावर किंवा फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर एखादी वस्तू कमी किमतीत उपलब्ध करून दिली जात असल्याची जाहिरात केली जाते. नागरिकही स्वस्तात वस्तू मिळत असल्याने तत्काळ संबंधित जाहिरातीतील संकेतस्थळ, लिंकला प्रतिसाद देतात. त्यानंतर नागरिकांच्या बॅंक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन सायबर गुन्हेगार डल्ला मारतात. यानंतर नागरिकांची गैरसोय, त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याबरोबरच फसवणूक होऊ शकणारे बनावट संकेतस्थळ कसे ओळखायचे, यासाठी ‘सेफकॉम फाउंडेशन’ या संस्थेने नोव्हेंबर महिन्यात ‘व्हॉट्‍सॲप चॅट बॉट’ तयार केले आहे. त्याद्वारे कोणतेही संकेतस्थळ वापरण्यापूर्वी त्याची सुरक्षितता तपासण्यात येईल. नेदरलॅंडमधील ‘ई-कॉमर्स’ या कंपनीच्या सहकार्याने सेफकॉमने बॉटची निर्मिती केली आहे.

बॉट म्हणजे काय?

‘बॉट’ (बिल्ड ऑरेट ट्रान्सफर) म्हणजे स्वयंचलित संगणकीय प्रोग्राम. एका व्यक्तीला कोणतेही काम एकावेळी जास्त क्षमतेने करता येत नाही, ते काम बॉट एकाच वेळेस व अतिशय जलद, सोप्या पद्धतीने करू शकतो. इंटरनेट बॉट, चॅट बॉट, सोशल बॉट, व्हिडिओ गेम बॉट असे बॉटचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. या बॉटला इंटरनेट रोबोट, स्पायडर्स, क्रॉलर किंव वेब बॉट या नावांनीही ओळखले जाते.

Online Cheating
पुणे महापालिकेचे डोळे राज्य शासनाकडे थकीत असलेल्या १००० कोटीकडे

‘व्हॉट्‍सॲप बॉट’चा वापर करायचा कसा?

तुम्हाला ऑनलाइन खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्ही ठराविक कंपन्यांच्या वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला त्या संकेतस्थळाच्या सत्यतेबाबत प्रश्‍न पडतो. त्या वेळी संबंधित व्यक्तीने त्या संकेतस्थळाचे यूआरएल (लिंक) ‘व्हॉट्‍सॲप बॉट’च्या क्रमांकावर पाठवायचे. त्यानंतर बॉटकडून त्या संकेतस्थळाची सत्यता पडताळण्यात येईल. संबंधित संकेतस्थळाबाबत स्टार किंवा पॉइंट्‍स दिले जातात. कमी स्टार किंवा कमी पॉइंट दिसल्यास संबंधित संकेतस्थळ हे वापरण्यासाठी अयोग्य असल्याचे समजावे. त्यास सर्वाधिक स्टार किंवा पॉइंट्‍स असल्यास ते वापरण्यायोग्य समजावे, त्यानंतरच खरेदीस प्राधान्य द्यावे.

ऑनलाइन पैसे पाठविताना झालेल्या फसवणुकीच्या तक्रारी - २ हजार २८७* - * पुण्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२१ पर्यंत

देशात २०१९ मध्ये सायबर गैरव्यवहारांची संख्या - १ कोटी २३ लाख

या फसवणुकीत आर्थिक नुकसान - १.२ दश अब्ज

व्हॉट्‍सॲप चॅट बॉट क्रमांक - ९१५२०१९१५२

ऑनलाइन खरेदी-विक्री करणारे नागरिक हे नकळतपणे सायबर गुन्हेगारांचे सावज ठरतात. ते टाळण्यासाठीच आम्ही ‘व्हॉट्‍सअॅप बॉट’ची निर्मिती केली आहे. त्याद्वारे खऱ्या-खोट्या संकेतस्थळाची माहिती मिळाल्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक टळते. त्याचा सर्वाधिक फायदा नागरिकांना होतो.

- तुषार भगत, संस्थापक, सेफकॉप फाउंडेशन

नोकरीमुळे दुकानात जाऊन प्रत्यक्षात खरेदीला वेळ मिळत नाही. त्यामुळे आम्ही ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतो. मागील आठवड्यात ऑनलाइन कपडे खरेदी करत असताना मला संबंधित संकेतस्थळाविषयी शंका आली. त्यानुसार, मी त्या संकेतस्थळाचे यूआरएल ‘व्हॉट्‍सॲप बॉट’वर टाकले. काही मिनिटांतच त्यास सर्वांत कमी स्टार असल्याचे दिसल्यानंतर मी सावध झालो.

- वैभव कदम, नोकरदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com