मृत्युपत्रासह १४ सेवा आता घरबसल्या मिळणार

मृत्युपत्रासह १४ सेवा आता घरबसल्या मिळणार
Published on: 

पुणे, ता. ७ : नगरपालिका किंवा महापालिका हद्दीतील नागरिकांना आता मृत्युपत्राची (इच्छापत्र) नोंद मिळकत पत्रिकेवर (प्रॉपर्टी कार्ड) करण्यासाठी नगर भूमापन कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही. भूमी अभिलेख विभागाने आपल्या ‘ईप्सित’ या पोर्टलवर ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली असून, ही संपूर्ण प्रक्रिया आता नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहे.
मृत्युपत्रासोबतच भाडेपट्टा, हस्तांतरण करार, रद्द करार, चूक दुरुस्ती आणि कन्फर्मेशन डीड यांसारख्या विविध महत्त्वाच्या व्यवहारांच्या नोंदी मिळकत पत्रिकेवर ऑनलाइन करता येतील. तसेच, नागरिकांना घर, जमीन किंवा सदनिकेची दस्तनोंदणी करताना यापूर्वी मिळकत पत्रिका प्रत्यक्ष जमा करावी लागत होती. मात्र, आता भूमी अभिलेख विभागाने आपली मिळकत पत्रिका प्रणाली नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ‘आय-सरिता’ प्रणालीशी ‘एपीआय’द्वारे थेट जोडली आहे. त्यामुळे नोंदणी कार्यालयात सरकारी अभिलेखातील अधिकृत मिळकत पत्रिका संगणकावर आपोआप उपलब्ध होत आहे. बनावट किंवा फेरफार केलेली मिळकत पत्रिका सादर करून होणाऱ्या खरेदी-विक्रीला आणि फसवणुकीला यामुळे पूर्णपणे चाप बसला आहे. याशिवाय ‘बीपीएमएस’ प्रणालीसोबतही याचे एकत्रीकरण केले आहे.

राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगर भूमापन क्षेत्रातील नागरिकांना गतिमान सेवा देण्यासाठी अर्बन सिटी सर्व्हेचे सर्व्हर अद्ययावत केले आहे. ‘ईप्सित’ पोर्टलद्वारे नागरिकांना १४ नागरी सेवा घरबसल्या उपलब्ध होणार आहेत.
- शैलेश नवाल, जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख

मिळकत पत्रिकेवर मृत्यूपत्र, भाडेपट्टा, रद्द करार किंवा चूक दुरुस्तीच्या नोंदी घेताना यापूर्वी तांत्रिक मर्यादा येत होत्या. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी नवीन १४ मॉड्यूल्स विकसित केले आहेत. नागरिकांना नगर भूमापन कार्यालयात न येता घरबसल्या ‘ईप्सित’ पोर्टलवरून त्यासाठी अर्ज करता येतील.
- हेमंत निकम, उपसंचालक, भूमी अभिलेख विभाग

महत्त्वाचे...
६ ऐवजी १४ मॉड्यूल्स : तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कामकाजाचा विस्तार.
अनेक सेवा समाविष्ट : मृत्यूपत्र, भाडेपट्टा, दुरुस्ती पत्र व वारस हक्क नोंदी सोप्या.
कोर्ट आदेशांची अंमलबजावणी : एकाच दिवसात स्वयंचलित (ऑटोमॅटिक) प्रक्रिया.
नागरिकांना दिलासा : कार्यालयाच्या फेऱ्या टळणार, वेळ अन् श्रम वाचणार.
कारभारात पारदर्शकता : ऑनलाइन सुविधेमुळे कामाला गती मिळणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com