फिटनेस प्रेमी अजूनही धास्तावलेलेच; जिमचालक आणि नागरिक म्हणतात...

Gym_Fitness
Gym_Fitness

पुणे : परवानगी मिळाली म्हणून व्यायामप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने येतील यासाठी जिमच्या उपकरणांची दुरुस्ती आणि साफसफाईचे काम केले. खबरदारी म्हणून मास्क, सॅनिटायझर, ऑक्‍सिमीटर, थर्मलगनसारख्या साधनांची खरेदी केली. आता तरी ग्राहकांची संख्या वाढेल, उत्पन्नाला चालना मिळेल आणि दिवाळी पण गोड होईल अशी आशा होती; परंतु व्यायामप्रेमी अजूनही धास्तावल्याचे दिसत असल्याचे मत शहरातील विविध जिमचालक आणि मालकांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे बंद असलेल्या राज्य सरकारने 25 ऑक्‍टोबरपासून खुल्या केल्या. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिमचालकांनी तयारी केली. त्यासाठी त्यांच्या ट्रेनर्सला पाचारण केले. थंडी सुरू झाल्यावर व्यायामाला येणाऱ्यांची संख्या वाढते, असे दरवर्षी दिसते. यंदाही कोरोनामुळे व्यायामप्रेमी नागरिकांची संख्या नक्की वाढेल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु, सध्या फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जिमच्या जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार अशा अनेक अडचणी जिमचालकांना उद्‌भवल्या आहेत. 

याबाबत जिमचालक डॉ. मनीष पटवर्धन म्हणाले, ''पूर्वी 16 तासांमध्ये सुमारे 500 नागरिक जिममध्ये व्यायामासाठी येत होते. परंतु आता दिवसभरात फक्त 100 ते 150 नागरिकच येतात. त्यामुळे सध्या केवळ 25 ते 30 टक्केच नागरिकांकडून जिमचा वापर केला जात आहे. यामध्ये युवकांची संख्या जास्त आहे. परंतु 40 वर्षांपुढील नागरिकांची संख्या कमी आहे. '' 

प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करत आहोत. जिम वेळोवेळी सॅनिटाईज केले जाते, पण लोकांमध्ये अजूनही कोरोनाची भीती आहे. त्यामुळे, जिममध्ये येणाऱ्यांची संख्या सध्या तरी कमी आहे. ट्रेनर, सफाई कर्मचारी आणि इतर खर्च निघेल का? हा प्रश्‍न आहेच. मात्र ही भीती दूर करण्याचा तसेच शरीरासाठी व्यायाम हा किती महत्त्वाचा आहे, हा मुद्दा नागरिकांसमोर ठसविण्यासाठी आम्ही जनजागृती करीत आहोत. 
- रिपुंजय लष्करे, जिमचालक

''सात ते आठ महिने झाले आहेत घरीच आहे. दैनंदिन कामात आणि रोजच्या सवयींमध्ये बदल झाले आहेत. जिम सुरू झाले असले तरी जिमला जाण्याची सवय पुन्हा निर्माण करायला वेळ लागेल.'' 
- सौरभ आर्या, नागरिक 

''सध्या संसर्गाचे प्रमाण जरी कमी असले तरी कुटुंबाच्या काळजीसाठी मी जिमला जात नाही. गेल्या वर्षापासून मी सातत्याने जिमला जात आहे. परंतु दोन्ही मुलं आणि सासू घरीच असतात. त्यांचे वय हे 60च्या पुढे आहे. माझी प्रतिकार शक्ती चांगली असली तरी त्यांना संसर्ग होणार नाही असे नाही. जिममध्ये वेगवेगळ्या भागातून लोक येणार. त्यामुळे हा आजार कदाचित माझ्यामार्फत घरी येऊ शकतो. त्यासाठी जिममध्ये जाणे टाळत आहे. 
- संध्या टिळक, गृहिणी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com