मांगल्यमय चैतन्यपर्वास सुरवात 

baba1.jpeg
baba1.jpeg

पुणे  सुख, शांती, संपन्नतेची प्रतीक असलेली, बुद्धीची देवता, विघ्नविनाशक गणेशाची घरोघर भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. औंध, खडकी, बाणेर, बालेवाडी परिसरात सकाळपासून लाडक्‍या बाप्पाची मूर्ती; तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ वाजवत, "गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करीत गणरायाचे घरोघरी आगमन झाले. विधिवत पूजा-अर्चा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी सायंकाळचा मुर्हूत साधला. आज सुरू झालेल्या चैतन्यदायीपर्वास पुढील दहा दिवसांत उत्तरोत्तर उधाण येत जाणार आहे. 

औंध - बोपोडी परिसरात भक्तिमय वातावरण 

औंध : औंध, बोपोडी, सकाळनगर, विद्यापीठ परिसरात घरगुती गणेशाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळपासूनच बालचमूंसह सहकुटुंब गणेशमूर्ती खरेदी करण्यात रमून गेले होते. 

औंध भागातील गावठाण, डीपी रस्ता, नागरस रस्ता, आयटीआय रस्ता, सानेवाडीतील सर्व सोसायट्यांसह घरांमध्ये गणपतीमूर्तीची प्रतिष्ठापना भक्तिभावाने मंत्रोच्चारात करण्यात आली. पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी करण्याकडे सर्वच नागरिकांचा कल दिसून आला. त्यामुळे गणेशभक्तांनी पर्यावरणरक्षण व जागृतीसह कृतिशीलतेतून शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्तींचीच प्रतिष्ठापना केल्याचे दिसून आले. लहान-थोरांनी बाप्पांची मूर्ती वाजतगाजत घरी आणून उत्साहपूर्ण व भक्तिभावाच्या वातावरणात पूजन केले. 
बाजारातील तयार मोदकांना मागणी असली, तरीही काहींनी खास करून घरीच मोदक बनविण्यास पसंती दिली. एकूणच, गणरायाच्या स्वागतासाठी सर्वच तल्लीन झाले होते. 
एकीकडे घरगुती गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असतानाच विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांची मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसह देखावे उभारण्याची लगबग सुरू होती. औंधमधील भैरवनाथ तरुण मंडळ, रणवीर तरुण मीत्र मंडळ, वरची तालीम, मलिंग मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ यांसह इतर मंडळांनी आपापल्या पद्धतीने देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यातील भैरवनाथ तरुण मंडळाने या वर्षी मिरवणूक व प्रतिष्ठापनेवर होणारा खर्च टाळून ती रक्कम सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना दिली आहे. हा एक समाजोपयोगी कार्याचा आदर्श मंडळाने या गणेशोत्सवानिमित्ताने घालून दिला आहे. नेहमीप्रमाणेच या वर्षीही गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र दिसून येत असली, तरी पश्‍चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची किनारही अनेक ठिकाणी या वेळी दिसून आली. एकूणच, घरगुती व सोसायटीतील गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना आज भक्तिभावात झाल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळाले. 
--------------
बाणेर-बालेवाडीत जल्लोषात स्वागत 
बाणेर-बालेवाडी परिसरात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी लाडक्‍या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले; 
तर सार्वजनिक मंडळांनी सायंकाळचा मुहूर्त साधला. 
गणेश प्रतिष्ठापनेसाठी कालपासूनच बाजारात हार, फुले, दूर्वा खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळचा मुहूर्त साधण्यासाठी काहींनी कालच आपल्या मूर्ती घरी नेल्या. रविवारी सुटी असल्याने घरातील बच्चेकंपनी तर खूपच उत्साहाने घरात आरास करण्यासाठी मदत करत होते. रात्री उशिरापर्यंत जागून ही आरास पूर्ण करण्यात आली. सकाळपासूनच गणपती विक्री केंद्रावर आपल्या लाडक्‍या बाप्पाला घरी नेण्याची लगबग सुरू होती. या ठिकाणी सनई, हलगी, ताशा, टाळवादक उपस्थित होते. "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या निनादाने सर्व परिसर दुमदुमून निघाला. वाजत-गाजत गणपती बाप्पाला घरी नेले जात होते. 

सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची आरास, देखावे पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू होती. या विघहर्त्या बाप्पाच्या स्वागतासाठी ढोलपथके सज्ज होती. मंडळांच्या गणपती मिरवणुकीमुळे वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक पोलिस यंत्रणा सकाळपासूनच सज्ज होती. लहान मोठ्या पावसाच्या सरी बाप्पाच्या स्वागतासाठी पायघड्या घालत होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com