आरटीईच्या चौथ्या फेरीचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

पिंपरी (पुणे) : बहुप्रतीक्षेत आरटीईच्या चौथ्या विशेष फेरीचा मार्ग मोकळा झाला असून, सोमवारी (ता. 9) सोडत काढण्यात येणार आहे. पालकांनी 21 सप्टेंबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्‍यक असल्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) दत्तात्रेय जगताप यांनी सांगितले. 

पिंपरी (पुणे) : बहुप्रतीक्षेत आरटीईच्या चौथ्या विशेष फेरीचा मार्ग मोकळा झाला असून, सोमवारी (ता. 9) सोडत काढण्यात येणार आहे. पालकांनी 21 सप्टेंबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्‍यक असल्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) दत्तात्रेय जगताप यांनी सांगितले. 

आरटीईच्या प्रवेशप्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने केवळ तीन फेऱ्या राबविल्या. या फेरीनंतरही हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्याने पालकांकडून पुढील प्रवेश फेरी कधी होणार, याबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली.आरटीईच्या तब्बल दीड हजार जागा रिक्त असल्याने त्यासाठी चौथी फेरी राबविण्याची मागणी आरटीई पालक संघाने केली होती; तसेच प्रवेशप्रक्रिया फेब्रुवारीतच राबविल्यास बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील, अशीही मागणी संघाचे अध्यक्ष हेमंत मोरे यांनी प्राथमिक शिक्षण संचालकांकडे केली होती. त्यानुसार या जागांसाठी चौथी सोडत काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठविला होता. 

या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत 2019-20 या शैक्षणिक वर्षात 172 शाळांमधील तीन हजार जागांसाठी 22 हजार 260 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. प्रवेशाच्या तीन फेऱ्यांमधून तीन हजार 500 विद्यार्थ्यांची निवड झाली. मात्र, त्यातील केवळ दोन हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याने दीड हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. 

एसएमएसवर अवलंबून राहू नका 
आरटीईच्या तिसऱ्या फेरीपर्यंत जागा रिक्त राहिल्या आहेत. पालकांच्या आणि संस्थांच्या मागणीनुसार चौथी विशेष लॉटरी काढण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सोमवारी ही लॉटरी काढण्यात येईल. पालकांना लॉटरीनंतर एसएमएस मिळतील. त्यांनी बुधवारपासून (ता. 11) शाळेत जाऊन प्रवेश घेण्यास सुरवात करावी; तसेच एसएमएस न आल्यास आरटीईच्या संकेतस्थळावर जाऊन ऍप्लिकेशनवाइज डिटेल्समध्ये अर्ज क्रमांक लिहून लॉटरीची पडताळणी करावी. केवळ एसएमएसवर अवलंबून राहू नये, असे शिक्षण संचालक जगताप यांनी स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: open the route for fourth round of rte