हजारोंचा दृष्टीदाता डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्त!

हजारोंचा दृष्टीदाता डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्त!
Updated on

बारामती : ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना नेत्रदान करणारे प्रसिध्द नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल (ता. 30) सेवानिवृत्त झाले. बिनटाक्याच्या मोतीबिंदूच्या लाखाहून अधिक शस्त्रक्रिया करुन समाजातील कष्टकरी, शेतकरी व अगदी उच्चभ्रू लोकांनाही नवदृष्टी देण्याचे काम डॉ. लहाने यांनी केले.

डॉ. लहाने, डॉ. रागिणी पारेख यांचा बारामतीशी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने संबंध येतो. सुनेत्रा पवार यांच्या एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रकिया शिबीरांचे बारामतीत आयोजन केले जाते. प्रत्येक शिबीरामध्ये किमान पाचशेहून अधिक रुग्णांवर डॉ. लहाने व डॉ. पारेख शस्त्रक्रिया करतात. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आणि हजारो लोकांना व्यवस्थित दृष्टी मिळाली.

आपल्या आईची (डॉ. लहाने यांच्या शब्दात त्यांची माय...) किडनी मिळाल्यानंतर पुर्नजन्म झाल्यानंतर त्यांनी सामाजिक सेवेसाठी स्वताःला वाहून घेतले. अतिशय गरीब कुटुंबातून आल्यामुळे त्यांना गरीबीची आणि कष्टकरी शेतकरी बांधवांच्या दुःखांची जाण होती. साधे राहणीमान असलेल्या डॉ. लहाने यांनी तळागाळातील, आदिवासी बांधवांसाठी आपले जीवन वाहून घेतले होते. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्यांचे काम चालत असले तरी विविध शिबीरांच्या निमित्ताने त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. आनंदवन येथे डॉ. बाबा आमटे यांच्या पुढाकाराने झालेल्या शिबीरातून त्यांनी दुर्गम भागातील अनेक मोतीबिंदू झालेल्या आदिवासी बांधवांनाही दृष्टी दिली.

तळातील कष्टकऱ्यांच्या शस्त्रक्रीयांसह अगदी हाय प्रोफाईल व्यक्तींवरही त्यांनी यशस्वी उपचार केले. बारामतीतील शिबीरात एक एडसग्रस्त व्यक्ती होती, तिच्यावर कोणीच उपचार करायला तयार नव्हते, त्या व्यक्तीची खाजगी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रीया करुन घेण्याची परिस्थितीही नव्हती. लहाने यांनी त्याला तपासून लगेचच शिबीरात दाखल करुन त्याच्यावर शस्त्रक्रीया केली, त्याला दिसू लागले. दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झालेल्या अनेक रुग्णांवर त्यांनी उपचार केले, बारामती परिसरात अनेकांनी पहिली शस्त्रक्रीया झाल्यानंतर दुस-या डोळ्याला मोतीबिंदू झाल्यावर लहाने यांच्याच हातून शस्त्रक्रियेचा आग्रह धरत त्या करुन घेतल्या. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण, कर्जत, राशिन, माळशिरस, श्रीगोंदा, नातेपुते, सोलापूर या परिसरातून लोकांनी बारामतीतील फोरमच्या शिबीरातून शस्त्रक्रिया करुन घेतल्या.

हसतखेळत उपचार...

आलेल्या रुग्णांशी हसून खेळून बोलत, त्याला आपलेसे करुन घेत मग त्याच्यावर उपचार करण्याच्या लहाने यांच्या कार्यपध्दतीमुळे आजही त्यांच्यावर ग्रामीण भागातील रुग्णांचा प्रचंड विश्वास आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे काल बारामती परिसरात त्यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.

निवृत्तीनंतरही काम सुरुच ठेवणार...

दरम्यान निवृत्तीनंतरही समाजसेवेचे घेतलेले हे व्रत असेच कायम सुरुच ठेवणार असल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेले हे काम आपण पुढे सुरु ठेवू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com