कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी

solar eclipse
solar eclipse

येत्या २६ डिसेंबर रोजी सकाळी आपणास कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची दुर्मिळ संधी मिळत आहे.

हे ग्रहण भारतासह सौदी अरेबिया, श्रीलंका, इंडोनेशिया व ऑस्ट्रेलियामध्ये दिसेल. संपूर्ण भारतात खंडग्रास ग्रहण दिसत असून, सूर्याचे कंकण मात्र फक्त केरळ, कर्नाटक, तमिळनाडूमधील १६० किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यातूनच पाहता येईल. कंकणाकृती सूर्यग्रहणात अमावास्येच्या चंद्राचा प्रवास सूर्यबिंबावरून होताना दिसतो. चंद्र पृथ्वीपासून दूर असल्यास तो पूर्णपणे सूर्याला झाकू न शकल्याने सूर्यबिंबाची कड दिसत राहून सूर्याचे कंकण दिसते. यापूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी भारताच्या दक्षिण भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. 

येथे ग्रहण सकाळी ८ च्या सुमारास सुरू होत असून ११ वाजता सुटेल. या वेळच्या ग्रहणात सूर्याभोवतालचे कंकण सुमारे ३ मिनिटभर सकाळी ९.२८ वाजता पाहता येईल. या काळात महाराष्ट्रात सुमारे ७०-८० टक्के सूर्यबिंब चंद्राने झाकल्याचे दिसेल. पुण्याच्या परिसरात ९.२३ वाजता ७९ टक्के सूर्य झाकला गेल्याचे पाहता येईल. ज्यांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहावयाचे आहे, त्यांनी केरळमधील बेकल फोर्ट, कन्नूर, मंगलोर, उटी, पोलची, कोईम्बतूर व तिरपूर यांसारख्या शहराच्या परिसरात जावे. यापुढचे कंकणाकृती सूर्यग्रहण २१ जून २०२० मध्ये होत असून, ते भारतातील उत्तरेकडच्या भागातून पाहता येईल. 

ग्रह
बुध - गेल्या महिन्याच्या अखेरीस बुध सूर्यापासून दूरात दूर अंतरावर गेल्याने जास्त काळ दिसला होता. या महिन्याच्या प्रारंभी तो सूर्योदयापूर्वी जवळ जवळ दीड तास पूर्वेस उगवताना दिसेल. यानंतर बुध सूर्याकडे सरकत असल्याने लवकर लवकर मावळू लागेल. तो तूळ राशीत असून, वृश्‍चिकेकडे सरकत असताना ताऱ्याजवळून प्रवास करताना दिसेल. महिना अखेरीस बुध सूर्यसानिध्यामुळे संधी प्रकाशात दिसेनासा होईल.

शुक्र - सूर्यास्तानंतर दक्षिण पश्‍चिम क्षितिजावर तेजस्वी शुक्र चमकताना दिसेल. तो सूर्यापासून दूर होत क्षितिजावर उंच चढत असल्याने उशिरा मावळताना दिसेल. महिना अखेरीस सूर्यास्तानंतर जवळ जवळ अडीच तासाने शुक्र मावळेल. तो क्षितिजावर उंच चढत असताना त्याची गाठ क्षितिजाकडे खाली सरकत असलेल्या शनीबरोबर ११ डिसेंबर रोजी पडून देखणी युती पाहता येईल. या वेळी शुक्र तेजस्वी म्हणजे ३.९ तेजस्वितेचा तर शनी त्यापेक्षा मंद व ०.६ तेजस्वितेचा दिसेल. शुक्र चंद्रकोरी जवळ २९ डिसेंबर रोजी दिसेल. 

मंगळ - दक्षिण पूर्व क्षितिजावर पहाटे मंगळ दिसेल. तूळ राशीच्या पश्‍चिम भागात मंगळ दिसत असून, तो क्षितिजावरच्या बुध व चित्रा ताऱ्यांच्या मधील परिसरात दिसत आहे. मंगळ पृथ्वीपासून दूर अंतरावर असल्याने त्याचे बिंब अवघे ४ विकलांचे दिसत असून, त्याची तेजस्विता १.६ असेल. मंगळ पूर्वेकडे सरकत असून, तो १३ डिसेंबर रोजी तूळ राशीच्या अल्फा ताऱ्याजवळ पोहोचेल. या वेळी अल्फा तारा पांढरा, तर मंगळ नारंगी रंगाने चमकताना दिसेल. चंद्राजवळ मंगळ २२ तारखेला दिसेल. 

गुरू - दक्षिण पश्‍चिमेस संध्याकाळी गुरू दिसेल. तो क्षितिजालगत असल्याने क्षितिज स्वच्छ असल्यासच दिसू शकेल. गुरू वेगाने सूर्याकडे सरकत असल्याने लवकर लवकर मावळत जात दिसेनासा होईल. गुरूची सूर्याबरोबर युती २७ डिसेंबर रोजी होईल. 
शनी - सूर्यास्तानंतर दक्षिण पश्‍चिमेस पिवळसर रंगाचा शनी दिसेल. महिन्याच्या प्रारंभी रात्री पावणेनऊच्या सुमारास मावळणारा शनी क्षितिजाकडे सरकत असल्याने लवकर लवकर मावळत जाईल. महिनाअखेरीस शनी सूर्यास्तानंतर तासाभरातच मावळेल. या महिन्यात शनीचे बिंब १५ विकलांचे व ०.६ तेजस्वितेचे दिसेल. क्षितिजाकडे सरकणाऱ्या शनीची गाठ शुक्राबरोबर ११-१२ डिसेंबर रोजी पडेल. यानंतर शनी क्षितिजाकडे सरकत दिसेनासा होईल. चंद्रकोरीजवळ शनी २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी दिसेल. 

युरेनस - नेपच्युन - अंधार पडताच मंद तेजाचा युरेनस मेष राशीच्या दक्षिणेकडच्या भागात दिसत आहे. या राशीच्या बीटा ताऱ्याच्या खालच्या बाजूस युरेनस असून, त्याची तेजस्विता ५.७ असेल. नेपच्युन कुंभ राशीत दिसत असून, त्याची तेजस्विता ७.९ असेल. कुंभ राशीतील फाय ताऱ्याजवळ नेपच्युन दिसेल. युरेनस व नेपच्युन हे दोन्ही ग्रह पाहण्यासाठी बॉयनॉक्‍युलर्सची मदत घ्यावी लागेल. 

उल्कावर्षाव - या महिन्यात १३ तारखेला कश ताऱ्याजवळून फेकल्या जाणाऱ्या ‘जेमिनीड्‌स’ उल्का दिसतील. तसेच २२ डिसेंबर रोजी ध्रुवमत्स्यातील बीटा ताऱ्याजवळून फेकल्या जाणाऱ्या ‘उर्सीड्‌स’च्या उल्का दिसतील. डिसेंबर १३चा उल्का वर्षाव चंद्रप्रकाशामुळे फारसा नीट दिसू शकणार नाही.

चंद्र-सूर्य - मार्गशीर्ष पौर्णिमा १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.४२ वाजता येईल, तर अमावास्या २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.४३ वाजता होईल. चंद्र पृथ्वीपासून दूर (४,०४,४४६ कि.मी.) डिसेंबर पाच रोजी, तर पृथ्वीजवळ (३,७०,२६५ कि.मी.) डिसेंबर १९ रोजी पोहोचेल. सूर्य २२ डिसेंबर रोजी दक्षिणतम स्थानावर (अविष्टंभ) पोहोचेल. यादिवशी आपल्याकडे दिवस छोटा व रात्र मोठी असेल. आता सूर्य पुन्हा आपल्याकडे म्हणजे उत्तरेकडे सरकू लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com