नीरव मोदीला दणका; 7,300 कोटी व्याजासह परत करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 July 2019

- निरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश
- कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी दिले आदेश
- देशातील हा पहिलाच निकाल 
- तीनपैकी दोन दावे निकाली

पुणे : हिरा व्यापारी निरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश आज येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी दिले आहेत. 

मोदी व त्यांच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. बँकेचे कर्मचारी गोकुळ नाथ शेट्टी आणि मनोज हनुमंत खरात यांनी मोदी यांना मदत केल्याचे निकालात नमूद आहे. 

मोदीने केलेल्या फसवणुकी विरोधात पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. सुनावणीत बँकेच्या वकिलांनी आपली बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. मोदी यांच्यावतीने कोणीही न्यायालयासमोर हजर नव्हते. बँकेच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणाचा निकाल 6 जुलैला देण्यात येईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट  केले होते. 

तीनपैकी दोन दावे निकाली :
बँकेने नीरव मोदी विरोधात तीन दावे दाखल केले असून त्यांपैकी पहिला दावा 7000 कोटी रुपयांचा आहे. दुसरा दावा 300 कोटी रुपयांचा आहे. तर तिसरा दावा 1700 कोटी रुपयांचा आहे. त्यातील दोन दाव्यांचा युक्तिवाद होऊन निकाल झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to Nirav Modi for returning loan of 7 thousand 300 crores with interest